Surah Al Bakrah With Marathi Translation | Read Marathi Quran Translation

2.अल् बकरा - ٱلْبَقَرَة

अल्लाहच्या नावाने जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे

  1. अलीफ लाऽऽम मीऽऽम.
  2. हा अल्लाहचा ग्रंथ आहे. यात काही संशय नाही. मार्गदर्शन आहे अल्लाहचे भय बाळगणार्‍या त्या लोकांसाठी
  3. जे परोक्ष वर श्रद्धा ठेवतात, नमाज कायम करतात आणि जी उपजीविका आम्ही त्यांना दिली आहे तिच्यामधून खर्च करतात
  4. जो ग्रंथ (हे मुहम्मद स.) तुमच्यावर अवतरला आहे (अर्थात कुरआन) आणि जे (ग्रंथ) तुमच्या पूर्वी अवतरले आहेत त्या सर्वांवर (देखील) जे श्रद्धा ठेवतात आणि मरणोत्तर जीवनावर दृढ विश्वास ठेवतात.
  5. असेच लोक आपल्या पालनकर्त्याकडून सन्मार्गावर आहेत. आणि तेच सफल होणारे आहेत.
  6. ज्या लोकांनी (या गोष्टींचा स्वीकार करण्यास) नकार दिला त्यांच्यासाठी सर्वकाही समान आहे. तुम्ही त्यांना सावध करा अथवा करू नका ते कदापि मानणार (श्रद्धा ठेवणार) नाहीत.
  7. अल्लाहने त्यांच्या हृदयांवर शिक्कामोर्तब केले आहे. आणि त्यांच्या कानांवर व डोळ्यांवर पडदा पडलेला आहे. (त्यामुळे) त्यांना कठोर शिक्षा आहे.
  8. काही लोक असे आहेत जे सांगतात की आम्ही अल्लाहवर आणि अंतिम न्यायदिनावर श्रद्धा ठेवतो. वास्तविक ते श्रद्धावंत नाहीत.
  9. काही लोक असे आहेत जे सांगतात की आम्ही अल्लाहवर आणि अंतिम न्यायदिनावर श्रद्धा ठेवतो. वास्तविक ते श्रद्धावंत नाहीत.
  10. त्यांच्या हृदयात विकृती आहे. जिला अल्लाहने अधिक वाढू दिली आहे. आणि जे काही खोटे ते बोलताहेत त्याबद्दल त्यांना यातनामय शिक्षा आहे.
  11. जेव्हा त्यांना सांगितले जाते की, पृथ्वीवर उपद्रव माजवू नका तेव्हा ते म्हणतात की, ’’आम्ही तर सुधारणा करणारे आहोत!’’
  12. सावधान! हेच लोक उपद्रवी आहेत, परंतु त्यांना ते कळत नाही.
  13. आणि जेव्हा त्यांना सांगितले जाते की, ’’ज्याप्रमाणे इतरांनी श्रद्धा ठेवली त्याचप्रमाणे तुम्हीसुद्धा श्रद्धा ठेवा.’’ तेव्हा ते म्हणतात की, ’’काय, आम्ही मूर्खासारखी श्रद्धा ठेवावी? सावधान! हेच लोक मूर्ख आहेत, परंतु त्यांना त्याचे ज्ञान नाही.
  14. जेव्हा ते श्रद्धावंतांना भेटतात तेव्हा म्हणतात, ’’आम्हीही श्रद्धा ठेवली आहे’’ पण जेव्हा ते आपल्या शैतानांना भेटतात तेव्हा म्हणतात की, ’’आम्ही तर तुमच्याच बरोबर आहोत आणि या लोकांची थट्टा करीत आहोत.
  15. (वास्तविक) अल्लाहच त्यांची थट्टा करीत आहे. त्यांना त्यांच्या बंडखोरीमध्येच राहू देत आहे. (त्यामुळे) ते ह्या बंडखोरीमध्ये असेच भरकटत चालले आहेत.
  16. हेच ते लोक आहेत ज्यांनी मार्गदर्शनाच्याऐवजी मार्गभ्रष्टता खरेदी केली आहे. परंतु त्यांच्या या व्यवहारामध्ये न त्यांना फायदा झाला न ते सन्मार्गावर आहेत.
  17. त्यांचे उदाहरण असे आहे जसे एखाद्या व्याक्तीने अग्नी प्रज्वलित करावा, त्यामुळे सर्व परिसर प्रकाशमान व्हावा आणि (त्याचवेळी) अल्लाहने ह्यांची दृष्टी हिरावून घ्यावी व ह्याना अशा अवस्थेत सोडावे की अंधारात ह्यांना काहीही दिसू नये.
  18. हे बहिरे, मुके (व) आंधळे आहेत. तेव्हा हे मागे परतणार नाहीत.
  19. किंवा (ह्यांचे उदाहरण असे आहे की,) आकाशातून पर्जन्याचा वर्षाव होत आहे त्याचबरोबर अंधार, कडकडाट आणि लखलखाटही होत आहे. विजेचा कडकडाट ऐकून जीवाच्या भीतीने कानात बोटे खुपसून घेत आहेत. आणि अल्लाहने ह्या सत्य नाकारणार्‍यांना (चोहिकडून) वेढले आहे.
  20. लखलखाटामुळे ह्यांची अवस्था अशी आहे जणु काही लवकरच ह्यांची दृष्टी हिरावून घेतली जाईल. जेव्हा त्यांच्यावर वीज चमकते तेव्हा त्या प्रकाशात ते पुढे चालू लागतात. आणि जेव्हा त्यांच्यावर अंधार पसरतो तेव्हा ते उभेच राहतात. अल्लाहने जर इच्छिले असते तर ह्यांची श्रवणशक्ति व दृकशक्ति (दृष्टी) पूर्णतः हिरावून घेतली असती. निःसंशय अल्लाह सर्व गोष्टींवर सामर्थ्यवान आहे.
  21. लोकहो, उपासना (भक्ती) करा आपल्या पालनकर्त्याची ज्याने तुम्हाला आणि तुमच्या पूर्वीच्यांनाही निर्माण केले .जेणेकरून तुम्ही (दुष्कृत्यापासून) परावृत्त राहू शकाल.
  22. तोच तर आहे ज्याने तुमच्यासाठी पृथ्वीचा बिछाना आणि आकाशाचे छत बनवले. आणि आकाशातून पर्जन्य वर्षविले आणि त्यापासून सर्व प्रकारची पिके व फळे तुमच्या उपजीविकेसाठी उत्पन्न केली. तेव्हा हे जाणत असताना (अन्य कुणालाही) अल्लाहचे समवर्ती ठरवू नका.
  23. जर तुम्हाला आमच्या दासांवरील या ग्रंथाचे अवतरण आमच्याकडून (साक्षात अल्लाहकडून) असण्याबद्दल शंका असेल तर यातील अध्यायासमान एकच अध्याय रचून दाखवा. आपल्या सर्व समर्थकांना बोलवा. एक अल्लाह शिवाय ज्या कुणाची हवी असेल त्याची मदत घ्या आणि जर तुम्ही खरे असाल तर हे कार्य करून दाखवा.
  24. मात्र जर तुम्ही तसे केले नाही आणि कदापि करू शकणार नाही, तर भिऊन असा त्या भयंकर अग्नीला ज्याचे इंधन असेल मानव व दगड जो सत्याचा विरोध करणार्‍यांसाठी भडकावलेला असेल.
  25. आणि हे पैगंबर (स.), जे या ग्रंथावर इमान धारण करतील व (यानुसार) सद्वर्तन करतील त्यांना खुशखबर द्या की त्यांच्यासाठी अशी नंदनवने असतील ज्यांच्या खालून झरे वाहत असतील. या बागांतील फळे दिसण्यात जगातील फळांसारखीच असतील. जेव्हा त्यांना एखादे फळ दिले जाईल तेव्हा ते म्हणतील की अशीच फळे यापूर्वी जगात आम्हाला दिली जात असत त्यांच्यासाठी तिथे पवित्र व चारित्र्यवान सहजीवनी असतील. आणि ते सदैव तिथेच राहतील.
  26. निःसंशय डास किंवा त्यापेक्षाही क्षुद्र गोष्टींचे उदाहरण देण्यास अल्लाहला मुळीच संकोच वाटत नाही. जे लोक श्रद्धा ठेवतात ते जाणतात की हे त्यांच्या पालनकर्त्याकडून आलेले सत्य आहे. आणि जे नाकारणार आहेत ते म्हणतात की ’’ह्या उदाहरणात अल्लाहचे काय प्रयोजन आहे?’’ अल्लाह यामधून कित्येकांना मार्गभ्रष्ट होऊ देईल तर कित्येकांना सन्मार्ग दाखवील.परंतु अवज्ञा करणार्‍यांव्यतिरिक्त अन्य कुणालाही तो मार्गभ्रष्ट होऊ देणार नाही.
  27. अल्लाहशी केलेल्या वचनाशी दृढबद्ध झाल्यानंतरही जे वचनभंग करतात आणि अल्लाहने ज्यांच्याशी संबंध जोडण्याचा आदेश दिला आहे त्याच्याशी संबंध तोडून टाकतात आणि पृथ्वीवर अनाचार माजवितात हेच ते आहेत जे नुकसान भोगणार आहेत.
  28. अल्लाहला तुम्ही कसे नाकारता? जेव्हा तुम्ही निर्जीव होतात तेव्हा त्याने तुम्हाला जीवन प्रदान केले. नंतर तोच तुमचे प्राण हरण करील. नंतर तुम्हाला पुनरुज्जीवन देईल. नंतर त्याच्याकडेच तुम्हाला परत जावयाचे आहे.
  29. तोच तर आहे ज्याने पृथ्वीमध्ये तुमच्यासाठी सर्व गोष्टी निर्माण केल्या. नंतर आकाशाभिमुख झाला आणि सप्तआकाश बनविले. आणि तोच प्रत्येक गोष्टीला जाणतो आहे.
  30. आणि (आठवण करा) जेव्हा तुमच्या पालनकर्त्याने दूतांना सांगितले की, ’’मी पृथ्वीवर एक खलीफा (माझा प्रतिनिधी) बनविणार आहे.’’ (तेव्हा त्या दूतांनी) विचारले, ’’काय, तू हिच्यामध्ये त्याला बनविणार आहेस, जो हिच्यामथ्ये अनाचार घडवील आणि रक्तपात करील? (पण) आमच्याकडून तर तुझे स्तवनासह गुणगान होत आहे, पवित्रगान होत आहे. (तेव्हा अल्लाह) म्हणाला, ’’मी जाणतो जे तुम्ही जाणत नाही.’’
  31. आणि अल्लाहने आदमला सर्व नावे शिकविली. नंतर (त्यांना) (सर्व वस्तूंना) दूतांसमोर ठेवले आणि म्हणाला, ’’जर तुम्ही सत्यवादी असाल, तर या वस्तूंची नावे सांगा!’’
  32. ते म्हणाले, ’’तूच महिमावंत आहेस. तू जे काही आम्हाला शिकवलेस तेवढेच ज्ञान आम्हाला आहे. निःसंशय तूच सर्वज्ञ आणि तत्त्वज्ञ आहेस.’’
  33. मग अल्लाहने आदमला सांगितले ’’यांना ह्या सर्व वस्तूंची नावे सांग.’’ नंतर जेव्हा त्याने (आदमने) दूतांना सर्व नावे सांगितली तेव्हा (अल्लाह) म्हणाला, ’’काय, मी तुम्हाला सांगितले नव्हते की, आकाश आणि पृथ्वीमधील गुप्त गोष्टी मीच जाणतो आणि मी तेही जाणतो जे काही तुम्ही प्रकट करता आणि जे काही लपविता?’’
  34. आणि (आठवण करा) जेव्हा आम्ही दूतांना आदेश दिला की, ’’आदमच्या पुढे नतमस्तक व्हा. तेव्हा सर्वजण नतमस्तक झाले. परंतु इब्लीस झाला नाही. त्याने नाकारले व अहंकार केला आणि अवज्ञाकारींपैकी झाला.
  35. मग आम्ही आदमला सांगितले की, ’’हे आदम, तू आणि तुझी पत्नी दोघेही स्वर्गामध्ये राहा आणि इथे मनसोत्क् हवे ते खा. परंतु ह्या झाडाच्या जवळ जाऊ नका. अन्यथा तुम्ही अत्याचारी व्हाल.’’
  36. (पण) शेवटी शैतानाने त्यांना त्यापासून मार्गभ्रष्ट केले आणि जिथे ते होते तिथून बाहेर काढले. (तेव्हा) आम्ही आदेश दिला की, ’’खाली उतरा तुम्ही एकमेकांचे शत्रू आहात. आणि तुम्हाला एका निश्चित काळापर्यंत पृथ्वीवर रहावयाचे आहे. आणि तिथेच निर्वाह करायचा आहे.
  37. नंतर आदमने आपल्या पालनकर्त्याकडून काही वचने शिकून घेतली. आणि पश्चात्ताप व्यक्त केला. तेव्हा अल्लाहने त्याच्या पश्चात्तापाचा स्वीकार केला. निःसंशय तो क्षमावंत आणि दयावंत आहे.
  38. आम्ही सांगितले की, ’’तुम्ही सर्वजण इथून खाली उतरा. नंतर जर माझ्याकडून तुमच्याकडे काही मार्गदर्शन लाभले तर जे माझ्या मार्गदर्शनाचे अनुसरण करतील तर त्यांना न कोणते भय असेल न ते कधी शोक करतील.
  39. आणि जे लोक हे नाकारतील आणि आमच्या वचनांना खोटे ठरवतील तेच नरकाग्नीमध्ये पडतील आणि तिथेच सदैव खितपत राहतील.
  40. ’’हे इस्राईलच्या संततीनो, आठवण करा माझ्या त्या अनुग्रहाची जो मी तुमच्यावर केला होता आणि माझ्याशी केलेल्या वचन-कराराची तुम्ही पूर्तता करा. तुमच्याशी केलेल्या कराराची मी पूर्तता करीन. आणि फक्त माझेच भय बाळगा.
  41. आणि जो ग्रंथ मी अवतरला आहे त्यावर श्रद्धा ठेवा. जो तुमच्याजवळ असलेल्या ग्रंथाचे समर्थन करणारा आहे. आणि त्याला सर्वांपेक्षा अधिक नाकारणारे तुम्ही होवू नका. आणि माझ्या संकेतवचनांना अल्पशः लाभासाठी विकू नका. माझ्या कोपापासून स्वतःला वाचवा
  42. आणि सत्याला असत्याचे आवरण घालून सत्य लपवू नका जेव्हा तुम्ही जाणता.
  43. नमाज कायम करा, जकात अदा करा आणि जे माझ्यापुढे झुकत आहेत त्यांच्यासोबत तुम्हीही झुका.
  44. तुम्ही तर इतरांना सन्मार्गाचा अंगिकार करण्यास सांगता परंतु स्वतःला मात्र विसरता? वास्तविक तुम्ही ग्रंथाचे वाचन करीत आहात. काय तुम्ही बुद्धीचा मुळीच उपयोग करीत नाही?
  45. संयम व नमाजाचे सहाय्य घ्या. निःसंशय नमाज हे अत्यंत कठीण कर्म आहे. परंतु त्या सेवकांसाठी कठीण नाही
  46. जे जाणतात की सरतेशेवटी आपल्या पालनकर्त्याला भेटावयाचे आहे. आणि त्याच्याचकडे परत जावयाचे आहे.’’
  47. ’’हे इस्राईलच्या संततीनों, आठवण करा माझ्या अनुग्रहाची ज्याने मी तुम्हाला उपकृत केले होते. आणि जगातील सर्व जनसमुहावर श्रेष्ठत्व प्रदान केले होते.
  48. आणि त्या दिवसाचे भय बाळगा जेव्हा कुणीही कुणाच्या यत्किंचितही उपयोगी पडणार नाही. कुणाकडून शिफारसही स्वीकारली जाणार नाही. व कुणालाही मोबदला घेऊन सोडले जाणार नाही. आणि गुन्हेगारांना कुठूनही मदत मिळू शकणार नाही.’’
  49. ’’आठवण करा त्या वेळेची जेव्हा आम्ही तुम्हाला फिरऔनी सत्तेच्या गुलामगिरीतून मुक्त केले. ज्यांनी तुम्हाला भयंकर यातनेत अडकवून ठेवले होते; तुमच्या मुलांना ठार करीत होते आणि तुमच्या मुलींना जिवंत ठेवीत होते. (वास्तविक) त्या स्थितीत तुमच्या पालनकर्त्याकडून तुमची परीक्षा पाहिली जात होती.
  50. आठवण करा जेव्हा आम्ही समुद्र दुभंगून तुम्हाला सुखरूप पार केले. नंतर तिथेच तुमच्या डोळ्यांदेखत फिरऔनच्या लोकांना बुडवून टाकले.
  51. आठवण करा, जेव्हा आम्ही मूसा (अ.) यांना चाळीस रात्रींच्या करारावर बोलविले तेव्हा तुम्ही त्याच्या मागे वासराचीच पूजा केलीत. तेव्हा तुम्ही घोर अत्याचार केलात.
  52. परंतु तरीही आम्ही तुम्हाला क्षमा केली जेणेकरून तुम्ही कृतज्ञ व्हाल.
  53. आठवण करा जेव्हा तुम्ही हा अत्याचार करीत होतात तेव्हा आम्ही मूसाला ग्रंथ व सत्यासत्यतेची कसोटी प्रदान केली होती, की जेणेकरून तुम्ही सन्मार्ग प्राप्त करू शकाल.
  54. आठवण करा जेव्हा मूसा (अ.) (हा कृपाप्रसाद घेऊन परतला तेव्हा तो) आपल्या लोकांना म्हणाला की, ’’लोकहो, तुम्ही वासराला उपास्य ठरवून स्वतःवर भयंकर अत्याचार केलात. तेव्हा तुम्ही आपल्या निर्मात्याच्या पुढे पश्चात्ताप व्यक्त करा आणि आपल्या लोकांना मारा (ज्यांनी हा घोर अन्याय केला) यातच तुमच्या पालनकर्त्यापाशी तुमचे भले आहे. त्यावेळी तुमच्या निर्मात्याने तुमचा पश्चात्ताप स्वीकारला. तो अत्यंत क्षमावंत आणि दयावंत आहे.
  55. आठवण करा जेव्हा तुम्ही मूसाला सांगितले होते की, आम्ही तुमच्या सांगण्यावर कदापि विश्वास ठेवणार नाही जोपर्यंत आमच्या डोळ्यांनी उघडपणे अल्लाहला (तुझ्याशी बोलताना) पाहात नाही. त्यावेळी एका कडकडाटाने तुम्हाला गाठले आणि तुम्ही अचेत होऊन कोसळलात.
  56. परंतु आम्ही तुम्हाला पुन्हा सचेत उभे केले जेणेकरून या उपकारानंतर तरी तुम्ही कृतज्ञ राहाल.
  57. आम्ही तुमच्यावर ढगांची सावली केली. ’मन्न’ आणि ’सल्वा’चे अन्न तुम्हाला उपलब्ध करून दिले. तेव्हा तुमच्यासाठी ज्या स्वच्छ वस्तू तुम्हाला प्रदान केल्या आहेत त्याचा उपभोग घ्या. (परंतु तुमच्या पूर्वजांनी जे काही केले) तो त्यांनी आमच्यावर केलेला अत्याचार नसून त्यांनी स्वतःच त्यांच्यावर अत्याचार केला होता.
  58. आठवण करा जेव्हा आम्ही तुम्हाला सांगितले होते की, (जी वस्ती तुमच्यासमोर आहे) त्यामध्ये दाखल व्हा. तिथे जे उत्पन्न होते त्याचा मनसोक्त उपभोग घ्या परंतु वसाहतीच्या दरवाजातून नतमस्तक होऊन प्रवेश करा आणि ’हित्ततून’ ’हित्ततून’ म्हणत जा. आम्ही तुमच्या अपराधांना दुर्लक्षित करू आणि सदाचार्‍यांना खूप कृपा व दयेने उपकृत करू.
  59. परंतु जी गोष्ट त्यांना सांगितली होती तिला अत्याचार्‍यांनी बदलून वेगळीच बनविली. सरतेशेवटी अत्याचार करणार्‍यांविरूद्ध आम्ही आकाशातून प्रकोपाचा वर्षाव केला. ही शिक्षा होती त्या अवज्ञाकारांसाठी जी ते करीत होते.
  60. आठवण करा जेव्हा मूसा (अ.) यांनी आपल्या लोकांसाठी पाणी मिळावे म्हणून प्रार्थना केली तेव्हा आम्ही सांगितले की, ’’अमुक खडकावर आपली काठी मारा’’ त्यामुळे बारा स्रोत उसळून आले. आणि प्रत्येक टोळीने ओळखले की कोणता पाणवठा आपल्यासाठी आहे. (त्यावेळी हे मार्गदर्शन केले होते की) अल्लाहने दिलेल्या उपजीविकेचा उपभोग घ्या. आणि पृथ्वीवर अनाचार माजवत फिरू नका.
  61. आठवण करा जेव्हा, तुम्ही सांगितले होते की, ’’हे मूसा, आम्ही एकाच प्रकारच्या अन्नाचा उपभोग घेऊन संयम करू शकत नाही. आपल्या पालनकर्त्याकडे याचना करा की आमच्यासाठी जमिनीमधून पिके, भाजीपाला, गहू, लसूण, कांदा डाळी वगैरे उत्पन्न करावे.’’ तेव्हा मूसा (अ.) ने सांगितले की, ’’एक उत्तम प्रकारच्या वस्तूऐवजी तुम्ही कनिष्ठ दर्जाच्या वस्तू घेऊ इच्छिता?’’ ठीक, कोणत्यातरी शहरी वस्तीमध्ये जाऊन राहा, जे काही तुम्ही मागता ते तिथे मिळेल.’’ सरतेशेवटी इतकी पाळी आली की त्यांच्यावर अपमान, अधोगती व दुर्दशा ओढवली. आणि ते अल्लाहच्या कोपाने वेढले गेले. हा परिणाम यामुळेच झाला की, अल्लाहच्या संकेताशी ते द्रोह करू लागले आणि प्रेषितांची नाहक हत्या करू लागले. हे ह्यामुळेच घडले कि त्यांनी अवज्ञा केली आणि शरिअत कायद्याचे वारंवार उल्लंघन केले.
  62. निसंशय जे श्रद्धावंत (मुहम्मद स. यांच्यावर श्रद्धा ठेवणारे) आहेत. तसेच यहुदी, ईसाई किंवा साबिईन आहेत जे जे कोणी अल्लाह व मरणोत्तर जीवनावर श्रद्धा ठेवतील आणि सत्कर्मे करतील त्यांचा मोबदला त्यांच्या पालनकर्त्यापाशी आहे. त्यांना न कोणते भय असेल न ते कधी शोक करतील.
  63. आठवा तो प्रसंग, जेव्हा आम्ही तूर पर्वताला तुमच्यावर अधांतरी उचलून धरले व तुमच्याकडून पक्के वचन घेतले आणि सांगितले कि, ’’जो ग्रंथ आम्ही तुम्हाला देत आहोत त्यानुसार आचरण करण्याच्या दृढ निश्चयाने त्याचा स्वीकार करा आणि जे आदेश त्यामध्ये दिले आहेत त्याचे स्मरण ठेवा. जेणेकरून तुम्ही धर्मपरायणतेच्या मार्गावर चालू शकाल’’.
  64. परंतु त्यानंतर तुम्ही आपल्या वचनाकडे पाठ फिरवली तरीदेखील अल्लाहचा अनुग्रह आणि त्याच्या दयेने तुमची साथ सोडली नाही अन्यथा तुम्ही केव्हाच उध्वस्त झाला असतात.
  65. तसेच तुम्हाला आपल्या जमातीपैकी त्या लोकांची गोष्ट तर माहितच आहे ज्यानी सब्तच्या नियमाचा भंग केला होता. तेव्हा आम्ही त्यांना सांगितले की ’’माकडे व्हा आणि अशा अवस्थेमध्ये रहा कि सर्व बाजूंनी तुमचा धिक्कार होवो.’’
  66. अशा तर्‍हेने आम्ही त्यांच्या झालेल्या परिणामाना तत्कालीन लोकांसाठी आणि नंतर येणार्‍या पिढ्यांसाठी बोध आणि शिकवण ठेवली.
  67. नंतर तो प्रसंगही आठवा जेव्हा मूसाने आपल्या लोकांना सांगितले कि अल्लाह तुम्हाला एका गाईचा बळी देण्यास सांगत आहे. तेव्हा ते म्हणू लागले ’’तुम्ही आमची थट्टा करता काय? तेव्हा मूसा म्हणाला कि असे अज्ञानी कृत्य करण्यापासून (परावृत्त राहण्यासाठी) मी अल्लाहकडे शरण मागतो. तेव्हा ते म्हणाले, ठीक आहे.
  68. आपल्या पालनकर्त्याकडे प्रार्थना करा कि त्याने गाईविषयी सविस्तर सांगावे. मूसाने म्हटले, ’’अल्लाहचा आदेश आहे की, गाय न वृद्ध असावी न अति लहान. मध्यम वयाची हवी. आता ईशआज्ञेचे अनुपालन करा.’’
  69. म्हणू लागले ’’अल्लाहला पुन्हा विचारा, तिचा रंग कसा असावा.’’ मूसा (अ.) ने सांगितले, ’’अल्लाहची इच्छा आहे, पिवळ्या जर्द रंगाची गाय हवी की पाहणार्‍यांचे मन प्रसन्न व्हावे.’’
  70. पुन्हा म्हणू लागले, ’’अल्लाहला स्पष्ट विचारून सांगा की, गाय कशी असावी. आम्ही तिच्यासंबंधी संभ्रमात आहोत. अल्लाहने इच्छिले तर आम्ही ती शोधून काढू’’.
  71. मूसाने उत्तर दिले, ’’अल्लाह फर्मावितो कि ती गाय अशी असावी जी राबविण्यांत आलेली नसेल किंवा जमीनही नांगरत नसेल अथवा पाणीही उपसत नसेल, धष्टपुष्ट परंतु डाग नसलेली असावी. त्यावर ते म्हणाले कि, ’’होय आता तुम्ही ठीक ठीक सांगितलेत. त्यानंतर त्यांनी तिचा बळी दिला एरव्ही ते असे करतील असे वाटले नव्हते.
  72. तुम्हाला आठवतो तो प्रसंग जेव्हा तुम्ही एका व्यक्तीचे प्राण घेतले होते. मग तिच्यासंबंधी भांडू लागला होतात. व एकमेकांवर खुनाचा आरोप ठेवू लागला होतात, आणि अल्लाहने निर्णय घेतला होता कि जे काही तुम्ही लपवीत आहांत तो ते उघडकीस आणील.
  73. त्यावेळेस आम्ही आज्ञा केली कि खून झालेल्या व्यक्तीच्या शवाला तिच्या एका भागाने आघात करा. पहा, अशाप्रकारे अल्लाह मृतांना पुनरुज्जीवन देतो आणि तुम्हाला आपले संकेत-चिन्हे दाखवितो जेणेकरून तुम्ही समजावे.
  74. परंतु असे संकेत-चिन्हे पाहून देखील शेवटी तुमची हृदये कठोर झाली, अगदी दगडाप्रमाणे कठोर. किंबहुना कठोरतेमध्ये त्यापेक्षाही अधिक. कारण दगडामध्ये एखादा असा असतो ज्याला पाझर फुटतो. आणि फुटून त्यामधून पाणी बाहेर पडते. व अल्लाहच्या भयाने तो खालीही कोसळतो. अल्लाह तुमच्या कारवायांपासून अनभिज्ञ नाही.
  75. हे मुस्लिमांनो, काय तुम्ही ह्या लोकांकडून अशी अपेक्षा करता कि हे तुमच्या आवाहनावर ईमान धारण करतील? वास्तविक यांच्यापैकी एका गटाची प्रवृत्ती अशी आहे कि अल्लाहची वाणी त्यांनी ऐकली आणि त्यानंतर चांगल्याप्रकारे समजून उमजून देखील हेतुपुरस्सर तिला विकृत केले.
  76. (अल्लाहचे प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यावर) ईमान धारण करणार्‍यांना जेव्हा हे भेटतात तेव्हा म्हणतात कि ’’आम्ही देखील ईमानधारक आहोत.’’ परंतु जेव्हा आपसांत एकमेकांशी एकांतात बोलतात तेव्हा म्हणतात कि ’’काय मूर्ख झालांत?’’ या लोकांना त्या गोष्टी सांगता ज्या अल्लाहने तुम्हांवर उघड केल्या आहेत की ज्यामुळे त्यांनी तुमच्या पालनकर्त्याजवळ तुमच्या विरोधात त्या सादर कराव्यात?
  77. काय हे जाणत नाहीत कि जे काही ते लपवितात आणि जे काही ते प्रकट करतात ते सर्वकाही अल्लाह जाणतो आहे?
  78. यांच्यामध्ये दुसरा एक गट निरक्षरांचा आहे. ज्यांना धर्मग्रंथाचे ज्ञान तर नाहीच. फक्त आपल्या इच्छा-आकांक्षांना ते कवटाळून बसले आहेत आणि केवळ भ्रामक कल्पनेंत भरकटत चालले आहेत
  79. तेव्हा त्या लोकांचा विनाश व विध्वंस आहे जे आपल्या हातांनी ग्रंथ लिहितात आणि लोकांना सांगतात कि ’’हा अल्लाहकडून आलेला आहे.’’ जेणेकरून त्याच्या मोबदल्यात काही लाभ करून घ्यावा. त्यांच्या हातांनी हे लिहिलेले देखील त्यांच्यासाठी विध्वंसाची सामुग्री आहे. आणि त्यांची ही कमाई देखील त्यांच्यासाठी विनाशकारक आहे.
  80. ते म्हणतात कि ’’नरकाग्नी आम्हाला कदापि स्पर्ष करू शकणार नाही फक्त काही थोड्या दिवसांची शिक्षा कदाचित झाली तर होईल.’’ त्यांना विचारा ’’काय तुम्ही अल्लाहकडून एखादे वचन घेतले आहे जे तो भंग करू शकणार नाही? किंवा अल्लाहच्या नांवावर अशा गोष्टी बोलता ज्याविषयी तुम्हाला ज्ञान नाही?’’ काय त्यांची जबाबदारी अल्लाहने घेतली आहे? तुम्हाला नरकाग्नि का शिवणार नाही.
  81. जो कोणी वाईट (कर्मे) कमवील आणि अपराधाच्या दुष्चक्रांत अडकून पडेल तो नरकवासी असेल आणि नरकामध्येच सदैव खितपत पडेल.
  82. परंतु जे ईमान धारण करतील व सदाचार करतील तेच स्वर्गात वास करणारे असतील आणि ते सदैव स्वर्गात राहतील.
  83. आठवण करा, इस्राईलच्या संततीकडून आम्ही दृढ वचन घेतले होते कि अल्लाहशिवाय अन्य कुणाचीही भक्ती करू नका. मातापित्याशी, नातेवाईकांशी, अनाथ व गोरगरीबांशी चांगले वागा. लोकांना चांगल्या गोष्टी सांगा. नमाजचे पालन करा आणि जकात द्या.परंतु थोडे लोक वगळता तुम्ही सर्वांनी ह्या वचनाकडे पाठ फिरवलीत. आणि अजूनही पाठ फिरवीत आहात
  84. तसेच आठवण करा, आम्ही तुमच्याकडून दृढ वचन घेतले होते कि आपसांत एकमेकांचे रक्त सांडू नका. एकमेकांना आपल्या घरापासून बेघर करू नका. आणि तुम्ही ते मान्यही केले होते. आणि स्वतः त्याचे साक्षीही आहात.
  85. परंतु आज तुम्ही तेच आहात जे आपल्या बांधवाची हत्या करता. आपल्या बांधवांपैकी काही लोकांना देशाबाहेर काढीत आहात. अत्याचार आणि अतीरेक करून त्यांच्याविरूद्ध कटकारस्थान करता. आणि जेव्हा ते युद्धबंदी होऊन तुमच्यापुढे येतात तेव्हा त्याना बंधमुक्त करण्यासाठी आर्थिक दंड घेता. वास्तविक त्यांना घराबाहेर काढणेच तुमच्यासाठी निषिद्ध होते. तर काय तुम्ही ग्रंथाच्या एका भागावर श्रद्धा ठेवता आणि दुसर्‍या भागाला नाकारता?
  86. तुमच्यापैकी जे लोक असे करतील त्यांच्यासाठी याशिवाय अन्य कोणती शिक्षा असेल कि ह्या ऐहिक जीवनामध्येही कठोर यातनांकडे त्यांना नेले जाईल. अल्लाह त्या कारवायांपासून अनभिज्ञ नाही ज्या तुम्ही करीत आहात. हे तेच लोक आहेत ज्यांनी मरणोत्तर जीवनाचा सौदा करून हे नश्वर जीवन खरेदी केले आहे. न ह्याची शिक्षा कमी होईल न ह्यांना कोणती मदत लाभेल.
  87. आम्ही मूसा (अ.) ला ग्रंथ दिला त्यानंतर सतत प्रेषित पाठविले. शेवटी मरियमपुत्र ईसाला स्पष्ट संकेत देऊन पाठविले. आणि पवित्र आत्म्याद्वारे त्याला मदत केली. पण तुमची ही कोणती रीत आहे कि जेव्हा जेव्हा कुणी प्रेषित तुमच्या इच्छेविरूद्ध कोणती गोष्ट घेऊन तुमच्याकडे आला तेव्हा तुम्ही त्या विरूद्ध बंडखोरी केलीत? काहीना खोटे ठरविलेत. तर काहींची हत्या केलीत.
  88. ते म्हणतात ’’आमची हृदये सुरक्षित आहेत.’’ कदापि नाही! सत्य गोष्ट ही आहे की त्यांच्या द्रोहामुळे अल्लाहने त्यांना धिक्कारलेले आहे म्हणून अल्पशीच श्रद्धा ते ठेवतात.
  89. तसेच आता जो ग्रंथ अल्लाहकडून त्यांच्याकडे आला आहे त्याच्याशीही त्यांचे वर्तन कसे आहे? इतकं असूनही कि तो ग्रंथ त्यांच्यापाशी आधीपासून असलेल्या ग्रंथाचे समर्थन करीत आहे आणि तो येण्यापूर्वी हे स्वतः नास्तिकांविरूद्ध विजय व मदत मिळण्यासाठी प्रार्थना करीत होते. परंतु ती गोष्ट जेव्हा आली जिला त्यांनी ओळखले देखील तरीही त्यांनी ती मान्य करण्यास नकार दिला. अल्लाहकडून धिक्कार होवो ह्या नाकारणार्‍यांचा!
  90. किती वाईट साधन आहे ज्याद्वारे हे लोक आपल्या जीवाचे समाधान करून घेत आहेत! कि जे मार्गदर्शन अल्लाहने अवतरले आहे त्याचा स्वीकार करण्यास केवळ ह्याच दुराग्रहामुळे ते नकार देत आहेत कि अल्लाहने (अवतरण व प्रेषितत्व) देऊन आपल्या सेवकाला स्वेच्छापूर्वक अनुग्रह दिला. तेव्हा आता ते प्रकोपापाठोपाठ प्रकोपांस पात्र ठरले आहेत. अशा नाकारणार्‍यांसाठी अपमानास्पद शिक्षा ठरलेलीच आहे.
  91. जेव्हा त्यांना सांगितले जाते कि अल्लाहने जे काही अवतरले आहे त्यावर ईमान धारण करा तेव्हा ते म्हणतात की, ’’आम्ही तर केवळ त्यावर ईमान धारण करतो जे आमच्याकडे (अर्थात इसराईलच्या संततीकडे) अवतरले आहे. त्याव्यतिरिक्त जे काही आले आहे ते मानण्याचे नाकारतात. वास्तविक ते सत्य आहे आणि त्या शिकवणीचे समर्थन करीत आहे जे ह्यांच्याकडे आधीपासून आहे. त्यांना सांग की, ’’जर तुम्ही फक्त त्याच शिकवणीवर विश्वास ठेवणार असाल जी तुमच्याकडे आली आहे तर यापूर्वी अल्लाहच्या त्या प्रेषितांची (जे खुद्द इसराईलच्या वंशामध्ये जन्मले होते) हत्या का केली?
  92. तुमच्याकडे कसकशा स्पष्ट संकेतांसह मूसा आले, तरीही तुम्ही असे अत्याचारी झालांत की त्यांची पाठ फिरताच वासराला उपास्य बनविले.
  93. जरा त्या दृढ वचनाचे स्मरण करा जे तूर पर्वताला तुमच्यावर उचलून धरून तुमच्याकडून आम्ही घेतले होते. आणि ताकीद दिली होती कि ’’जो आदेश आम्ही देत आहोत त्याचे दृढतेने पालन करा आणि लक्षपूर्वक ऐका.’’ तेव्हा तुमच्या पूर्वजांनी सांगितले कि, ’’आम्ही ऐकले परंतु ते आम्ही मानणार नाही.’’ त्यांच्या नकाराची अवस्था अशी होती कि त्यांच्या मनांत वासरूच वास करून बसले होते. सांग त्यांना कि, ’’जर तुम्ही ईमानधारक असाल तर तुमची ही श्रद्धा किती वाईट आहे जी अशा वाईट कृत्यांचा तुम्हाला आदेश देत आहे.
  94. त्यांना सांगा की जर खरोखरच अल्लाहच्याजवळ मरणोत्तर जीवनाचे घर सर्व लोकांना सोडून खास तुमच्यासाठीच असेल तर तुम्ही मृत्यूची इच्छा केली पाहिजे. जर तुम्ही आपल्या विचारामध्ये खरे असाल.
  95. लक्षात ठेवा कि हे कदापि तशी इच्छा करणार नाहीत. कारण आपल्या हाताने कमवून जे काही त्यांनी तिथे पाठविले आहे त्यावरून त्यांची हीच अपेक्षा आहे कि त्यांना तिथे जावे लागणार नाही. अल्लाह अशा अत्याचार्‍यांना उत्तम प्रकारे जाणतो आहे.
  96. जगण्याची लालसा करणार्‍यांमध्ये तुम्ही ह्यांना अधिक लोभी पहाल. इतके कि ह्यासंबंधी अनेकेश्वरवाद्यांपेक्षाही अधिक पलिकडे गेलेले पहाल. त्यांच्यापैकी प्रत्येकजण हे इच्छित आहे की कसेही करून हजार वर्षे जगावे. वास्तविक दिर्घायुष्य कोणत्याही परिस्थितीत त्यांना प्रकोपापासून वाचवू शकणार नाही जे जे कर्म ते करीत आहेत. अल्लाह ते पहात आहे.
  97. त्याना सांग कि जो कुणी जिबरीलशी वैर करतो त्याला हे समजावयास हवे कि जिबरीलने अल्लाहच्या आज्ञेनेच हा कुरआन तुझ्या हृदयावर अवतरला आहे. जो अगोदर आलेल्या ग्रंथाचे समर्थन करीत आहे. आणि ईमानधारकांसाठी मार्गदर्शन व यशाची शुभवार्ता घेऊन आलेला आहे.
  98. (जर जिबरीलशी यांच्या वैराचे कारण हेच असेल तर सांगा कि) अल्लाह, त्याचे दूत, त्याचे प्रेषित आणि जिबरील व मिकाईल यांचे जे शत्रू आहेत अल्लाह त्या नाकारणार्‍यांचा शत्रू आहे.
  99. आम्ही तुझ्याकडे अशी संकेतवचने अवतरली आहेत जी स्पष्टपणे सत्य व्यक्त करणारी आहेत. आणि त्यांचे अनुसरण करण्यास केवळ तेच लोक नाकारतात जे मार्गभ्रष्ट आहेत.
  100. नेहमी असेच घडत आले नाही काय कि जेव्हा जेव्हा त्यांना एखादे संकेतवचन दिले तेव्हा त्यांच्यापैकी एखाद्यातरी गटाने त्याचा भंग केला. किंबहुना त्यांच्यापैकी बहुतेक असेच आहेत जे मनापासून श्रद्धा ठेवीत नाही.
  101. आणि जेव्हा त्यांच्याकडे अल्लाहकडून कुणी प्रेषित त्या ग्रंथाची ग्वाही आणि समर्थन करणारा आला जो ग्रंथ यांच्याकडे पूर्वीपासून उपलब्ध होता- तेव्हा ह्या ग्रंथधारकांपैकी एका गटाने अल्लाहच्या ग्रंथाला अशारीतीने पाठीमागे टाकून दिले जणू काही त्यांना काहीच माहित नव्हते.
  102. आणि त्या गोष्टीचे अनुसरण करू लागले ज्या गोष्टी शैतान, सुलैमानच्या राज्याच्या नावाने सादर करीत असत. खरे पाहता ज्यांचा सुलैमानने कधीही द्रोह केला नाही. द्रोहामध्ये तर ते शैतान पडले होते जे लोकांना जादूटोण्याचे शिक्षण देत होते ते त्या गोष्टींच्या मागे लागले ज्या बाबीलमध्ये दोन दूत हारूत व मारूतवर अवतरल्या होत्या. वास्तविक ते (दूत) जेव्हा कधी कुणाला ह्याची शिकवण देत असत तेव्हा आधी स्पष्टपणे बजावीत असत कि, ’’पहा आम्ही एक सत्व परिक्षा आहोत तेव्हा तुम्ही द्रोहामध्ये पडू नका. तरीही हे लोक त्यांच्याकडून त्याच गोष्टी शिकत आले ज्यामुळे पतीपत्नीमध्ये दूही निर्माण व्हावी. ही तर स्पष्ट गोष्ट होती कि अल्लाहच्या अनुज्ञेशिवाय ते ह्यापासून कुणालाही हानी पोहोचवू शकत नव्हते. परंतु तरीही ते अशी गोष्ट शिकत आले जी खुद्द त्यांच्यासाठी लाभदायक तर नव्हतीच उलट हानीकारक होती आणि त्यांना चांगले माहित होते कि जो ह्या गोष्टीचा ग्राहक होईल त्याच्यासाठी मरणोत्तर जीवनांत काहीही हिस्सा नाही. किती वाईट सामुग्री होती ज्यासाठी स्वतःच्या जीवाच्या मोबदल्यांत त्यांनी सौदा केला आहे!
  103. किती चांगले झाले असते जर ते जाणत असते! श्रद्धा आणि अल्लाहचे भय बाळगले असते तर अल्लाहपाशी जो मोबदला त्यांना मिळाला असता तो त्यांच्यासाठी अधिक चांगला झाला असता. किती चांगले झाले असते जर त्यांना हे कळले असते!
  104. हे श्रद्धावानांनो, ’राईना’ म्हणू नका तर ’उन्जूरना’ म्हणा आणि लक्षपूर्वक ऐका. हे नाकारणारे तर दुःखदायी प्रकोपास पात्र आहेत.
  105. हे लोक, ज्यांनी सत्य स्वीकारण्याचे नाकारले आहे ते ग्रंथधारकांपैकी असोत किंवा अनेकेश्वरवादी असोत ते कदापि इच्छित नाहीत कि तुझ्या प्रभूकडून तुझ्याकडे काही भले अवतरावे. परंतु अल्लाह ज्याच्यासाठी इच्छितो त्याला आपल्या कृपेसाठी खास निवडतो आणि तो अत्यंत कृपावंत आहे.
  106. ज्या एखाद्या संकेतवचनाला आम्ही रद्द करतो किंवा त्याचे विस्मरण करवितो तेव्हा त्यापेक्षा अधिक चांगले किंवा तशाच प्रकारचे दुसरे संकेतवचन पाठवितो. काय तुम्ही जाणत नाही कि अल्लाहला प्रत्येक गोष्ट करण्याचे सामर्थ्य प्राप्त आहे?
  107. काय तुम्हाला ठाऊक नाही कि पृथ्वी आणि आकाशामध्ये अल्लाहचेच अधिपत्य आहे आणि त्याच्याशिवाय अन्य कुणीही तुमची काळजी घेणारा व मदत करणारा नाही?
  108. मग काय, तुम्ही आपल्या प्रेषिताकडे तशाच प्रकारचे प्रश्न आणि मागण्या करू इच्छिता जशा यापूर्वी मूसाकडे करण्यात आल्या होत्या? वास्तविक ज्या व्याक्तीने श्रद्धेच्या आचरणाऐवजी अश्रद्धेचे आचरण केले तो खचितच सरळ मार्गापासून भरकटला आहे.
  109. ग्रंथधारकांमध्ये बहुतेक लोक हे इच्छितात कि कसेही करून तुम्हाला श्रद्धेपासून दूर करून अश्रद्धेकडे न्यावे. जरी त्यांच्यावर सत्य प्रकट झाले आहे. तरीही आपल्या मनातील द्वेषामुळे तुमच्यासाठी त्यांची ही इच्छा आहे. त्यांना त्याबद्दल क्षमा कर व त्यांना तसेच सोडून दे. इथपर्यंत कि अल्लाह स्वतः आपला निर्णय लागू करील. निसंशय अल्लाहला सर्व गोष्टींवर सामर्ध्य आहे.
  110. नमाज अदा करा आणि जकात द्या. तुम्ही आपल्या मरणोत्तर जीवनासाठी जे काही भले कमवून पाठवता ते अल्लाहपाशी तुम्हाला आढळेल. (कारण) जे काही तुम्ही करीत आहात ते अल्लाहच्या दृष्टीमध्ये आहे.
  111. त्यांचं म्हणणं असं आहे कि कोणीही व्यक्ती स्वर्गामध्ये जाणार नाही जोपर्यंत ती यहूदी होत नाही किंवा (ख्रिस्ती लोकांच्या दृष्टिकोनांतून) ख्रिस्ती होत नाही. ही त्यांची मनोकामना (भ्रम) आहे. त्यांना सांग तुम्ही सत्य असाल तर पुरावा सादर करा.
  112. कदापि नाही! सत्य हे आहे कि जो कोणी अल्लाहच्या आज्ञापालनामध्ये स्वतःला समर्पित करील आणि सद्वर्तनी असेल त्याच्यासाठी त्याच्या पालनकर्त्याजवळ त्याचा मोबदला आहे आणि अशा लोकांना न कोणते भय असेल न ते कधी शोक करतील.
  113. यहुदी म्हणतात, ’’ख्रिस्तींच्या जवळ काहीही नाही.’’ ख्रिस्ती म्हणतात ’’यहुद्यांपाशी काहीही नाही.’’ वास्तविक दोघेही ग्रंथ वाचताहेत.आणि अशाच प्रकारे त्या लोकांचेही दावे आहेत ज्यांना ग्रंथाचे ज्ञान नाही. ज्या ज्या मतभेदांमध्ये ते पडले आहेत त्यांचा निर्णय अल्लाह पुनरुत्थानाच्या दिवशी करील.
  114. आणि त्या व्यक्तीपेक्षा अधिक अत्याचारी कोण असेल जो अल्लाहच्या प्रार्थनास्थळामध्ये त्याचे नामस्मरण करण्यास प्रतिबंध करतो. आणि त्या स्थळांना उध्वस्त करण्याचा प्रयत्न करतो? असे लोक त्या प्रार्थनागृहामध्ये पाय ठेवण्यासही पात्र नाहीत आणि जर कधी गेले तर त्यांनी भीतभीतच जावे. त्यांचा ह्या नश्वर जीवनामध्येही धिक्कार आहे. आणि मरणोत्तर जीवनामध्येही त्यांना यातना आहेत.
  115. पूर्व आणि पश्चिम अल्लाहच्याच आहेत. जिकडे तुम्ही तोंड कराल तिथे अल्लाहचे अस्तित्व आहे. कारण अल्लाह सर्वव्यापी आणि सर्वज्ञ आहे.
  116. त्यांचं म्हणणं आहे कि अल्लाहला पुत्रही आहे. अल्लाह तर या गोष्टीपेक्षा कितीतरी पवित्र आहे. वास्तविक सत्य हे आहे कि पृथ्वी आणि आकाशामधील सर्व गोष्टींचा स्वामी अल्लाह आहे. सर्वजण त्याचेच आज्ञाधारक आहेत.
  117. तोच आकाश आणि पृथ्वीचा प्रवर्तक आहे. जेव्हा एखादी घटना घटित करण्याचे इच्छितो तेव्हा फक्त म्हणतो, ’’तथास्तु’’ आणि क्षणार्धात तसे घडते.
  118. ज्यांना ज्ञान नाही ते म्हणतात कि अल्लाह स्वतः आमच्याशी कां बोलत नाही? किंवा आमच्याकडे एखादा संकेत कां येत नाही? अशाच गोष्टी यापूर्वीचे लोकही बोलत होते. त्या सर्वांची मनोवृत्ती सारखीच आहे. विश्वास ठेवणार्‍यांसाठी तर आम्ही स्पष्टपणे संकेतवचने उघड केली आहेत.
  119. (यापेक्षा स्पष्ट संकेत कोणता असेल कि) आम्ही तुला सत्य ज्ञानासह शुभवार्ता देणारा आणि सावध करणारा बनवून पाठविले आहे. तेव्हा नरकाशीच ज्यांचा संबंध जुळला आहे त्यांच्याबद्दल तू मुळीच जबाबदार नाहीस.
  120. यहुदी आणि ख्रिस्ती तुमच्याशी कदापी सहमत होणार नाहीत जोपर्यंत त्यांच्या पद्धतीने तुम्ही वागणार नाही. त्यांना स्पष्टपणे सांगा कि अल्लाहने सांगितलेला मार्गच योग्य आहे. अन्यथा तुझ्याकडे आलेल्या ज्ञानानंतर जर तू त्यांच्या इच्छांचे अनुसरण करशील तर अल्लाहच्या प्रकोपापासून वाचविणारा तुझा कोणीही मित्र किंवा सहाय्यक असणार नाही
  121. ज्या लोकांना आम्ही ग्रंथ दिले ते अशा रीतीने त्याचे अध्ययन करीत आहेत जसे त्यांनी करायला हवे. ते ह्यावर मनःपूर्वक श्रद्धा ठेवतात. परंतु जे त्याच्याशी द्रोह करतील तर त्यांनाच नुकसान सोसावे लागेल.
  122. हे इस्राईलच्या संततीनो, स्मरण करा माझा अनुग्रह ज्याने तुम्हास उपकृत केले होते. आणि तुम्हाला सर्व जनसमुदायावर श्रेष्ठत्व बहाल केले होते.
  123. तेव्हा त्या दिवसांपासून स्वतःला वाचवा जेव्हा कुणीही कुणाच्या यत्किंचितही उपयोगी पडणार नाही, न कुणाकडून मोबदला स्वीकारला जाईल न कुणाची शिफारस कुणाच्या उपयोगी पडेल न अपराध्याना कुठून कोणती मदत लाभेल.
  124. आठवण करा जेव्हा अल्लाहने इब्राहीमची काही गोष्टींमध्ये परीक्षा घेतली आणि जेव्हा तो परीक्षेमध्ये पूर्ण उतरला तेव्हा अल्लाहने त्यांना म्हटले, ’’मी तुला सर्व लोकांचा नेता म्हणून नियुक्त करीत आहे.’’ तेव्हा इब्राहीमने विचारले, ’’आणि माझ्या संततीसाठीही हेच अभिवचन आहे?’’ तेव्हा अल्लाहने उत्तर दिले, ’’माझे अभिवचन अत्याचार्‍यांसाठी नाही.’’
  125. आणि ह्या काबागृहाला आम्ही सार्‍या लोकांसाठी ’मध्यवर्ती शांतीस्थान’ निश्चित केले आणि लोकांना आदेश दिला कि इब्राहीम ज्या ठिकाणी प्रार्थनेसाठी उभा राहतो त्या स्थानाला कायमस्वरूपी नमाजचे स्थान बनवा. आणि इब्राहीम व इस्माईलला आदेश दिला कि, ’’माझ्या या घराला परिक्रमा आणि एकांतवास तसेच रुकूअ व सजदा (नमाज अदा) करणार्‍यांसाठी स्वच्छ (पवित्र) ठेवा.
  126. त्यानुसार इब्राहीमने प्रार्थना केली कि, ’’हे माझ्या पालनकर्त्या, ह्या नगराला शांतीनगर बनव आणि येथील निवासींपैकी जे लोक अल्लाह आणि मरणोत्तर जीवनावर श्रद्धा ठेवतील त्यांना उपजीविकेसाठी सर्व प्रकारची फळे दे.’’ त्याचा प्रतिसाद म्हणून त्यांच्या पालनकर्त्याने म्हटले, ’’परंतु जे मानणार नाहीत त्यांना ऐहिक नश्वर जीवनाची सामुग्री तर मी देईन परंतु शेवटी नरक यातनांकडे मी त्यांना फरफटत घेऊन जाईन आणि ते अत्यंत वाईट स्थान असेल.’’
  127. आणि स्मरण करा जेव्हा इब्राहीम आणि इस्माईल ह्या गृहाच्या भिंती उभारीत होते व प्रार्थना करीत होते कि, ’’हे आमच्या पालनकर्त्या, आमच्याकडून ह्या सेवेचा स्वीकार कर. तू सर्वांचे ऐकणारा आणि सर्वकाही जाणणारा आहेस.
  128. हे पालनकर्त्या आम्हा दोघांना तुझे आज्ञाधारक बनव. आमच्या वंशामधून असा समाज घडव जो तुझाच आज्ञाधारक झालेला असेल. आम्हाला आमच्या उपासनेचा विधी सांग. आणि आमच्या उणीवांकडे दुर्लक्ष कर. निसंशय तू क्षमावंत आणि दयावंत आहेस.
  129. आणि हे पालनकर्त्या या लोकांमध्ये ह्यांच्यातील एक प्रेषित उभा कर, जो तुझे संदेश यांना ऐकवील आणि यांना ग्रंथ आणि विवेकाची शिकवण देऊन ह्यांचे जीवन पवित्र करील. तूच प्रभुत्वशाली न्याय करणारा आहेस.
  130. इब्राहीमच्या पद्धतीकडे कोण पाठ फिरवील? जो स्वतःला अज्ञानी बनवील तोच इब्राहीमच्या धर्माकडे पाठ फिरवील. निसंशय आम्ही त्याला जगामध्ये आमचे कार्य करण्यासाठी निवडले होते. आणि परलोकामध्ये त्याची गणना सदाचार्‍यांमध्ये आहे.
  131. जेव्हा पालनकर्त्याने त्याला सांगितले ’’मुस्लिम हो’’ (स्वतःला समर्पित कर) तेव्हा तो त्वरित म्हणाला, ’’मी तर सार्‍या सृष्टीच्या पालनकर्त्याला समर्पित झालो आहे!’’
  132. आणि अशाच प्रकारचे आचरण करण्याचा आदेश त्याने आपल्या मुलाबाळांना दिला होता. आणि तोच आदेश याकूबनेही आपल्या संततीला दिला होता. त्याने म्हटले कि, ’’माझ्या मुलांनो, अल्लाहने तुमच्यासाठी हा धर्म पसंत केला आहे तेव्हा मरेपर्यंत अल्लाहला समर्पित होऊन रहा.’’
  133. ’’काय त्यावेळी तुम्ही उपस्थित होतात जेव्हा याकूब ह्या नश्वर जीवनाचा निरोप घेत होता?’’ त्याने मृत्यूसमयी आपल्या मुलांना विचारले, ’’मुलांनो माझ्या पश्चात तुम्ही कुणाची भक्ती कराल?’’ त्या सर्वांनी उत्तर दिले आम्ही तुझ्याच अल्लाहची भक्ती करू ज्याची तू आणि तुझे पूर्वज इब्राहीम, इस्माईल आणि इसहाकने भक्ती केली. आणि आम्ही त्यालाच समर्पित झालो आहोत,
  134. असे ते लोक होते जे होऊन गेले. जे काही त्यांनी कमाविले ते त्यांच्यासाठी आहे आणि जे काही तुम्ही कमविणार आहांत ते तुमच्यासाठी असेल. तुम्हाला हे विचारले जाणार नाही कि ते लोक काय करीत होते.
  135. यहूदी म्हणतात ’’यहूदी व्हा तर सन्मार्ग लाभेल.’’ ख्रिस्ती म्हणतात, ’’ख्रिस्ती व्हा तर तुम्हाला सन्मार्ग लाभेल.’’ त्यांना सांग, ’’नाही! धर्म तर इब्राहीमचा धर्म आहे. जो अनेकेश्वरवादी नव्हता.
  136. म्हणा कि, ’’आम्ही श्रद्धा ठेवली अल्लाहवर आणि त्या मार्गदर्शनावर जे आमच्याकडे अवतरले आणि जे इब्राहीम, इस्माईल, इसहाक, याकूब आणि याकूबच्या संततीकडे अवतरले आणि जे मूसा, ईसा आणि दुसर्‍या सर्व प्रेषितांना त्यांच्या पालनकर्त्याकडून दिले गेले. आम्ही त्यांच्यात कोणातही भेदभाव करीत नाही. आणि आम्ही अल्लाहलाच समर्पित झालो आहोत.’’
  137. जर त्या लोकांनीही अशी श्रद्धा ठेवली जशी श्रद्धा तुम्ही ठेवली आहे तर ते सन्मार्गावर आहेत. आणि जर याकडे पाठ फिरवली तर स्पष्ट आहे कि ते संशयामध्ये (संभ्रमामध्ये) पडले आहेत. तेव्हा खात्री बाळगा कि त्यांच्याविरूद्ध अल्लाह तुमचा सहाय्यकर्ता म्हणून पुरेसा आहे. तो सर्वकाही ऐकतो आणि जाणतो आहे.
  138. सांग कि ’’अल्लाहचा रंग अंगिकारा, त्याच्या रंगापेक्षा उत्तम रंग आणखी कुणाचा असेल? आम्ही त्याचीच भक्ती करीत आहोत.’’
  139. हे प्रेषित, त्यांना सांगा ’’काय तुम्ही अल्लाहविषयी आमच्याशी भांडता? वास्तविक तो आमचाही पालनकर्ता आहे आणि तुमचाही पालनकर्ता आहे. आमचे कर्म आमच्यासाठी आहे आणि तुमचे कर्म तुमच्यासाठी आहे. आणि आम्ही फक्त अल्लाहचीच भक्ती करीत आहोत.’’
  140. किंवा काय तुमचे असे म्हणणे आहे कि इब्राहीम, इस्माईल, इसहाक याकूब आणि याकूबची संतती सर्वच्या सर्वजण यहूदी होते? किंवा ईसाई होते? विचार, ’’तुम्ही अधिक जाणता कि अल्लाह? त्या व्यक्तीपेक्षा अधिक अत्याचारी कोण असेल की ज्याने ती साक्ष लपविली जी अल्लाहकडून त्याच्याकडे आली होती आणि अल्लाह अनभिज्ञ नाही,
  141. ते असे लोक होते जे होऊन गेले त्यांचे कर्मफळ त्यांच्यासाठी आहे. आणि तुमचे कर्मफळ तुमच्यासाठी आहे. त्यांच्या कर्माविषयी तुम्हाला विचारले जाणार नाही.
  142. मूर्ख लोक अवश्य विचारतील कि ’’यांना झालंय तरी काय? पूर्वी हे ज्या किबल्याकडे (उपासना दिशेकडे) तोंड करीत होते. आणि नमाज पठण करीत होते त्यापासून ह्यांनी तोंड फिरविले? हे प्रेषित, त्यांना सांग ’’पूर्व-पश्चिम सर्व दिशा अल्लाहच्याच आहेत. अल्लाह ज्याला इच्छितो त्याला सन्मार्ग दाखवितो.’’
  143. आणि अशाच प्रकारे तर आम्ही तुम्हाला उत्तम समाज बनविले आहे. जेणेकरून जगांतील लोकांवर तुम्ही साक्ष व्हा. आणि प्रेषित तुमच्यावर साक्षी असतील.’’ पूर्वी जिकडे तुम्ही तोंड करीत होतात तिकडे किबला (उपासना दिशा) यासाठी ठरविली होती कि आम्ही पाहू इच्छित होतो कि कोण प्रेषिताचे अनुकरण करतो आणि कोण उलट फिरतो. ही बाब अत्यंत कठीण होती. परंतु त्यांच्यासाठी मुळीच कठीण सिद्ध झाली नाही ज्यांना अल्लाहचे मार्गदर्शन लाभले. अल्लाह तुमची ही श्रद्धा कदापि व्यर्थ जाऊ देणार नाही. विश्वास ठेवा कि तो लोकांसाठी अत्यंत करुणावंत आणि कृपावंत आहे.
  144. हे प्रेषिता, तुमचे वारंवार आकाशाभिमुख होणे आम्ही पहात आहोत. म्हणून आम्ही त्याच किबल्याकडे (उपासना दिशेकडे) तुम्हाला वळवितो जे तुम्हाला अधिक पसंत आहे. तेव्हा मसजिदे-हरामकडे (काबागृहाकडे) तोंड करा. यापुढे जिथे कुठे तुम्ही असाल. तिथून तिच्याकडे तोंड करून नमाज पठण करा.
  145. ह्यापूर्वी ज्यांना ग्रंथ दिले आहेत. ते लोक चांगल्या प्रकारे जाणतात कि किबलाच्या परिवर्तनाचा (उपासना दिशा बदलण्याचा) हा आदेश त्यांच्या पालनकर्त्याकडूनच आलेला असून तो सत्यावर आधारित आहे परंतु याउपरही हे जे काही करीत आहेत त्यापासून अल्लाह अनभिज्ञ नाही. तुम्ही या ग्रंथधारकांकडे कोणतेही संकेत घेऊन या तरी हे तुमच्या उपासना दिशेचे अनुकरण करणार नाहीत. आणि तुम्हीही त्यांच्या उपासना दिशेचे अनुसरण करण्याची शक्यता नाही. आणि त्यांच्यापैकी कोणताही गट दुसर्‍या गटाच्या उपासना दिशेचे अनुकरण करणार नाही. तेव्हा जर ज्ञानानंतर, जे तुमच्याकडे आले आहे, त्यांच्या इच्छेनुसार अनुसरण केलेत तर खचितच तुमची गणना अत्याचार्‍यांमध्ये होईल.
  146. ज्या लोकांना आम्ही ग्रंथ दिला आहे ते ह्या स्थळाला (ज्याला उपासना दिशा निर्धारित केली आहे) असे ओळखतात जसे आपल्या मुलाबाळांना ओळखतात. परंतु त्यांच्यापैकी एक गट जाणूनबुजून सत्य लपवित आहे.
  147. तुमच्या पालनकर्त्याकडून आलेली ही सत्य गोष्टच आहे. तेव्हा ह्याविषयी तुम्ही साशंक राहू नका.
  148. प्रत्येकासाठी एक दिशा आहे जिकडे तो वळतो. तेव्हा तुम्ही सत्कर्मात एकमेकांपेक्षा अग्रेसर व्हा. जिथे कुठे तुम्ही असाल तिथे अल्लाह तुम्हाला एकत्रित करील. निसंशय ईश्वर सर्व गोष्टींवर सामर्थ्यवान आहे.
  149. कोणत्याही ठिकाणाहून तुम्ही निघाल तिथून आपले तोंड (नमाजच्या वेळी) मसजीदे हरामकडे वळवा. कारण हा तुमच्या पालनकर्त्याचा सर्वस्वी सत्याधिष्ठित निर्णय आहे आणि अल्लाह तुमच्या कर्माविषयी अनभिज्ञ नाही आणि जिथून कुठे जाल
  150. आपले तोंड मसजीदे हरामकडे (काबागृहाकडे) वळवा आणि जिथे कुठे असाल तिच्याकडेच तोंड करून नमाज पठण करा. ज्यामुळे लोकांना तुमच्या विरूद्ध भांडण्यासाठी कोणतेही कारण मिळू नये. होय, त्यांच्यामध्ये जे अत्याचारी आहेत ते कधीही गप्प बसणार नाहीत. तेव्हा त्यांना भिऊ नका. तर माझे भय बाळगा आणि यासाठी कि तुमच्यावर माझा अनुग्रह पूर्ण व्हावा.
  151. आणि ह्या अपेक्षेने कि माझ्या आदेशांच्या पालनाने तुम्हाला त्याचप्रकारे कल्याणाचा मार्ग लाभावा ज्या प्रकारे (तुम्हाला या गोष्टीने सफलता लाभली की) मी तुमच्यामध्ये खुद्द तुमच्यामधूनच एक प्रेषित पाठविला जो तुम्हाला आमचे संदेश ऐकवीत आहे. आणि तुमचे जीवन पवित्र करून तुम्हाला ग्रंथ व विवेकाची शिकवण देत आहे. आणि तुम्हाला त्या गोष्टी शिकवीत आहे ज्या तुम्हाला माहीत नाहीत.
  152. तेव्हा माझे स्मरण ठेवा मी तुमची आठवण ठेवीन. आणि माझ्याशी कृतज्ञ रहा कृतघ्न होऊ नका.
  153. हे श्रद्धावंतांनो, संयम आणि नमाजचे सहाय्य घ्या. अल्लाह संयमी लोकांच्या सोबत आहे.
  154. आणि जे अल्लाहच्या मार्गामध्ये मारले जातील त्यांना मृत म्हणू नका असे लोक तर वास्तविक जिवंत आहेत. परंतु त्यांचं जीवन तुम्ही जाणत नाही.
  155. आणि आम्ही खचितच तुम्हाला भय-भूख, जीवित व वित्त हानी आणि तुमच्या प्राप्तीमध्ये घट करून तुमची परिक्षा घेऊ.
  156. ह्या परिस्थितींत जे लोक संयमपूर्वक आचरण करतील. आणि जेव्हा जेव्हा आपत्ती येईल तेव्हा म्हणतील कि, ’’आम्ही अल्लाहचेच आहोत, आणि अल्लाहकडेच आम्हाला परत जायचे आहे.’’
  157. त्यांना शुभसंदेश द्या. त्यांच्यावर त्यांच्या पालनकर्त्याकडून मोठी कृपा होईल. आणि त्यांच्यावर दयेचे छत्र असेल आणि असेच लोक सन्मार्गी असतील.
  158. निसंशय सफा आणि मरवा अल्लाहच्या संकेतांपैकी आहेत. तेव्हा जो कोणी काबागृहाचे हज्ज किंवा उमरा करील त्याच्यामध्ये कोणताही दोष नाही कि या दोन (टेकड्यांच्या) दरम्यान तो परिक्रमा (प्रदक्षिणा) करील आणि जो कोणी स्वेच्छेने सत्कर्म करील तर निसंशय अल्लाहला त्याचे ज्ञान आहे आणि तो गुणग्राहकही आहे.
  159. आम्ही सर्व लोकांच्या मार्गदर्शनासाठी आपल्या ग्रंथात ज्याचे वर्णन केले आहे अशा आमच्या अवतरलेल्या स्पष्ट मार्गदर्शनाला जे लपवितात त्यांचा अल्लाहसुद्धा धिक्कार करतो आणि धिक्कार करणारेही त्यांचा धिक्कार करतात.
  160. तथापि जे लोक या प्रवृत्तीपासून परावृत्त होतील व सुधारणा करतील आणि स्पष्टपणे विवेचन करतील त्यांना मी क्षमा करतो आणि मी क्षमावंत आणि दयावंत आहे.
  161. निसंशय जे लोक नाकारतात आणि त्याच अवस्थेत त्यांचा मृत्यू होतो. हेच ते लोक आहेत. ज्यांच्यावर अल्लाह, त्याचे दूत आणि सर्व लोकांकडूनही धिक्कार होतो.
  162. आणि अशाच अवस्थेत ते सदैव राहतील. त्यांच्या शिक्षेमध्ये कोणतीही घट होणार नाही न त्याना कोणता अवधी दिला जाईल.
  163. तुमचा ईश्वर एकच ईश्वर आहे. त्या परम दयाळु व कृपाळु ईश्वराशिवाय अन्य कुणीही ईश्वर नाही.
  164. निसंशय आकाश आणि पृथ्वीच्या निर्मितीमध्ये, रात्रंदिनाच्या परिवर्तनामध्ये आणि समुद्रांत वाहणार्‍या नौकांमध्ये ज्या लोकांना लाभ देतात आणि जे पर्जन्य अल्लाहने आकाशांतून वर्षविले, व मृत जमीनीला पुनरुज्जीवीत केले आणि त्यामध्ये सर्व प्रकारच्या सजीवांचा विस्तार केला तसेच हवेच्या परिवर्तनामध्ये आणि आकाश व पृथ्वीच्या दरम्यान निरपेक्ष सेवा करण्यास कार्यरत केलेल्या ढगांमध्ये त्या लोकांसाठी संकेत आहेत जे ज्ञानी आहेत.
  165. (परंतु ईश्वराच्या एकत्वाचा इतका पुरावा असूनदेखील) काही लोक असे आहेत जे अल्लाह व्यतिरिक्त इतरांना समवर्ती बनवितात. आणि त्यांच्यावर असे प्रेम करतात जसे अल्लाहशी प्रेम करायला हवे. वास्तविक जे ईमान धारण करतात त्यांना अल्लाहच सर्वाधिक प्रिय आहे. जी गोष्ट प्रकोपाला समोर पाहिल्यानंतर सुचेल ती आजच जर या अत्याचारींना सुचली असती तर किती चांगले झाले असते? की सर्व अधिकार अल्लाहच्याच अखत्यारीत आहेत. आणि अल्लाह शिक्षा करण्यांत सुद्धा फार कठोर आहे.
  166. जेव्हा तो शिक्षा करील त्यावेळी परिस्थिती अशी असेल कि तेच नेते ज्यांचे जगामध्ये अनुकरण केले गेले होते ते आपल्या अनुयायींपासून विभक्त होतील परंतु त्यांना शिक्षा होणारच. आणि त्यांचे सर्व उपक्रम आणि साधनांचा संबंध संपुष्टात येईल
  167. आणि ते लोक जे जगांत यांच्या मागे चालत होते ते म्हणतील, ’’किती चांगले झाले असते जर आम्हाला पुन्हा एकदा संधी दिली असती तर ज्याप्रमाणे आज हे आमच्यापासून विभक्त होत आहेत आम्ही देखील त्यांच्यापासून विभक्त होऊन दाखविले असते.’’ अशाप्रकारे अल्लाह त्यांचे कर्म त्यांच्यासाठी हळहळ व्यक्त करणारे बनवून दाखवील. आणि ते अग्नीमधून बाहेर पडू शकणार नाहीत.
  168. लोकहो, जमीनीमध्ये ज्या वैध आणि शुद्ध गोष्टी आहेत त्यांचे सेवन करा. आणि शैतानाच्या पाऊलवाटेचे अनुसरण करू नका. निःसंशय तो तुमचा उघड शत्रू आहे.
  169. कारण तो तुम्हाला वाईट आणि अश्लील गोष्टींचा आदेश देत आहे जेणेकरून तुम्ही अल्लाहविषयी त्या गोष्टी बोला ज्या तुम्ही जाणत नाही.
  170. जेव्हा त्यांना सांगितले जाते कि तुम्ही त्या आज्ञांचे अनुसरण करा जे अल्लाहने अवतरले आहेत तेव्हा ते म्हणतात कि ’’आम्ही त्याच गोष्टींचे अनुसरण करू ज्याचे अनुसरण आमचे वाडवडील करीत होते.’’ त्यांना काहीही कळत नसताना व ते सन्मार्गावर नसताना देखील त्यांचेच अनुसरण करणार का?
  171. इन्कार करणार्‍या लोकांची अवस्था अशी आहे जणु गुराखी जनावरांना हांक देतो आणि जनावरे ओरड व हांकेखेरीज अन्य काहीच ऐकत नाहीत. ते बहिरे, मुके आणि आंधळे आहेत त्यामुळे त्यांना काहीही कळत नाही.
  172. हे ईमानधारकानो, तुम्ही पवित्र वस्तूंचे सेवन करा ज्या आम्ही तुम्हाला बहाल केल्या आहेत आणि अल्लाहशी कृतज्ञ रहा जर तुम्ही त्याचीच भक्ती करीत असाल.
  173. निसंशय अल्लाहकडून तुमच्यावर जर कोणता प्रतिबंध असेल तर तो म्हणजे तुम्ही मृत प्राण्यांचे मांस, रक्त, डुकराचे मांस आणि त्या गोष्टीही ज्यावर अल्लाह व्यतिरिक्त अन्य कुणाचे नांव घेतलेले असेल त्या गोष्टी तुमच्यासाठी वर्ज्य आहेत. परंतु जे लाचार असतील व जे अतीरेक करणारे नसतील आणि अल्लाहच्या मर्यादांचे उल्लंघन करण्याचा हेतू नसेल (त्यांनी जर ते खाल्ले) तर, त्यामध्ये कोणताही गुन्हा नाही. निःसंशय अल्लाह क्षमावंत आणि दयावंत आहे.
  174. जे लोक अल्लाहने अवतरलेल्या ग्रंथामधील सत्य लपवितात आणि क्षूद्र भौतिक लाभासाठी त्याचा सौदा करतात असे लोक अग्नी-भक्षण करून आपले उदरभरण करीत असतात. आणि अल्लाह पुनरुत्थानाच्या दिवशी त्यांच्याशी काहीही बोलणार नाही. न त्यांना पवित्र करील. आणि त्यांच्यासाठी यातनामय प्रकोप आहे.
  175. हेच ते लोक आहेत ज्यांनी सन्मार्गाऐवजी मार्गभ्रष्टता आणि क्षमेऐवजी प्रकोप ओढवून घेतला आहे. किती विचित्र आहे कि हे नरकाचा प्रकोप सहन करण्यास तयार आहेत.
  176. हे यामुळेच कि अल्लाहने तर सत्यासह ग्रंथ अवतरला परंतु त्या लोकांनी ग्रंथामध्ये मतभेद केला आणि दुराग्रह करून सत्यापासून दूर निघून गेले.
  177. सदाचार हा नव्हे कि तुम्ही आपले तोंड पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे करावे तर सदाचार हा आहे कि जे अल्लाहवर आणि अंतिम दिवसावर ईमान धारण करतात तसेच सर्व दूतांवर, सर्व ग्रंथ आणि सर्व प्रेषितांवर ईमान धारण करतात ईश्वरी प्रेमापोटी आपल्याला प्रिय असलेली संपत्ती आपले नातेवाईक आणि अनाथ गरजवंत, वाटसरू व याचक तसेच गुलामांच्या मुक्ततेसाठी खर्च करतात आणि नमाज कायम करतात व जकात अदा करतात तसेच दिलेल्या वचनांची पूर्तता करतात आणि अडचणी, संकटे आणि युद्धप्रसंगी देखील संयम राखतात हेच लोक सत्यशील आणि अल्लाहचे भय बाळगणारे आहेत.
  178. हे ईमानधारकानो, हत्येच्या बाबतीत तुमच्यासाठी हत्यादंडाचा आदेश नियत केला आहे. स्वतंत्र व्यक्तीने हत्या केली असेल तर त्या स्वतंत्र व्यक्तीस आणि गुलामाने हत्या केली असेल तर गुलामास मारले जावे आणि स्त्रीने हत्या केली असेल तर त्या स्त्रीची हत्या करावी. परंतु जर खूनी व्यक्तीच्या सोबत मृत व्यक्तीचा भाऊ जर क्षमेची वागणूक करू इच्छित असेल तर सर्वसामान्य नियमानुसार हत्यादंडाचा निर्णय घेतला जावा. खूनी व्यक्तीने चांगल्या प्रकारे अर्थदंड दिला पाहिजे. ही तुमच्या पालनकर्त्याकडून दिलेली मुभा आणि दया आहे. या उपर देखील जे अतीरेक करतील त्याच्यासाठी दुःखदायक यातना आहे.
  179. हे ज्ञानीजनहो, मृत्यूदंडामध्ये (समाजाच्या सुरक्षिततेचे) जीवन आहे. आशा आहे कि ह्या कायद्याचे भंग करण्यापासून तुम्ही स्वतःला वाचवाल.
  180. तुमच्यावर हे नियत केले आहे कि जेव्हा तुमच्यापैकी कुणाच्या मृत्यूची घटका येऊन ठेपेल आणि तो आपल्या पश्चात संपत्ती सोडून जात असेल तर त्याने आई-वडील आणि इतर नातेवाईकांसाठी प्रचलित पद्धतीने मृत्यूपत्र करावे हे सदाचार्‍यांसाठी महत्वाचे कर्तव्य आहे.
  181. नंतर ज्यांनी मृत्यूपत्र ऐकले व त्यामध्ये बदल केले तर त्याचा गुन्हा बदल करणार्‍यावर असेल. अल्लाह सर्वकाही ऐकतो व जाणतो.
  182. तरीसुद्धा ज्याला अशी शंका असेल कि मृत्यूपत्र करणार्‍याने अजाणतेपणी किंवा जाणूनबुजून एखाद्याला त्याच्या हक्कापासून वंचित केले असेल परंतु नंतर त्या वंचितांमध्ये समेट करील तर त्यामध्ये त्याचा कोणताही गुन्हा असणार नाही. अल्लाह क्षमावंत व दयावंत आहे.
  183. हे ईमानधारकानो, विहित केले तुमच्यावर उपवास जसे विहित केले होते तुमच्या पूर्वीच्यांवर जेणेकरून तुम्ही धर्मपरायण व्हाल.
  184. हे काही ठराविक दिवसांचे उपवास आहेत. तर तुमच्यापैकी जे आजारी असतील किंवा प्रवासांत असतील तर त्यांनी उपवास काळानंतर उपवास करावेत आणि ज्या लोकाना उपवास करण्याचे सामर्थ्य असेल (परंतु उपवास करणार नाहीत) त्यांनी दुर्बलांना मोबदला (फिदिया) म्हणून जेवू घालावे. एका उपवासासाठी एका दुर्बलाला जेवू घालावे आणि जो स्वेच्छापूर्वक अधिक भले करील तर ते त्याच्या स्वतःसाठीच भले आहे. परंतु जर तुम्ही जाणलेत तर तुमच्यासाठी हेच अधिक उचित आहे कि तुम्ही उपवास करावा.
  185. रमजान महिन्यामध्ये कुरआनचे अवतरण झाले- मानवजाती-करिता मार्गदर्शन व मार्गदर्शनाच्या सुस्पष्ट पुराव्यांनी समाविष्ट सत्य व असत्याची कसोटी. ज्या कुणाला ह्या महिन्याचा लाभ होईल त्याने ह्या महिन्यांत पूर्ण उपवास करावेत. आणि जे आजारी असतील किंवा प्रवासांत असतील त्यांनी उपवास काळानंतर उरलेल्या उपवासांची संख्या पूर्ण करावी. अल्लाह तुमच्यासाठी सुविधा इच्छितो अडचणी इच्छित नाही. ही पद्धत ह्यासाठीच सांगितली जात आहे की तुम्ही उपवासांची संख्या पूर्ण करावी व ज्या सरळ मार्गावर अल्लाहने तुम्हाला आणले आहे आणि जे मार्गदर्शन अल्लाहने तुम्हाला प्रदान केले आहे त्यावर तुम्ही अल्लाहची थोरवी वर्णावी तसेच तुम्ही अल्लाहचे ऋण व्यक्त करावे.
  186. आणि जेव्हा माझे भक्त तुम्हाला माझ्याबद्दल विचारतील तर (त्यांना सांगा की) मी तर सदैव निकट आहे. धांवा करणारा जेव्हा माझा धांवा करतो तेव्हा मी त्याच्या हांकेला प्रतिसाद देतो. तेव्हा त्याने माझ्या प्रतिसादाचा शोध घ्यावा माझ्यावर श्रद्धा ठेवावी जेणेकरून ते सन्मार्गावर येतील.
  187. तुमच्यासाठी उपवास काळांत रात्री आपल्या पत्नींजवळ जाणे वैध केले आहे. त्या तुमच्यासाठी पोषाख आहेत आणि तुम्ही त्यांच्यासाठी पोषाख आहांत अल्लाहने जाणले की तुम्ही गुपचुपपणे स्वतःशीच प्रतारणा करीत होतात. म्हणून त्याने तुम्हाला क्षमा केली आणि दुर्लक्षही केले. तेव्हा आता तुम्ही त्यांच्याशी सोबत करा आणि ईश्वराने तुमच्यासाठी विहित केले आहे त्याची इच्छा करा. आणि खा व प्या इथपर्यंत कि रात्रीच्या काळोखी रेषेपासून पहाटेची पांढुरकी रेषा स्पष्ट दिसून येईल तेव्हा ही सर्व कामे सोडून रात्रीपर्यंत आपला उपवास पूर्ण करा. आणि जेव्हा तुम्ही मसजीदमध्ये एकांतवास सुरू कराल तेव्हा आपल्या पत्नीशी (शरीर) संबंध ठेवू नका. या अल्लाहने घालून दिलेल्या मर्यादा आहेत. तेव्हा त्यांच्याजवळ जाऊ नका. अशा तर्‍हेने अल्लाह आपले आदेश लोकांकरिता स्पष्ट समजावून सांगत आहे. जेणेकरून ते चुकीच्या वर्तनापासून परावृत्त राहतील.
  188. आणि तुम्ही आपसामध्ये इतरांची संपत्ती अवैधपणे गिळंकृत करू नका किंवा आपल्या अधिकार्‍यांच्या पुढे ती ह्या हेतूने सादर करू नका कि तुम्हाला त्या संपत्तीमधील काही भाग हेतूपुरस्सर हकनाकपणे खाण्याची संधी मिळेल.
  189. लोक तुम्हाला चंद्राच्या घटत्या-वाढत्या कलांच्या विषयी विचारतात. त्यांना सांगा कि तो हजचा काळ आणि कालगणनेसाठी आहे. आणि सदाचार हा नव्हे कि तुम्ही आपल्या घरात मागील दाराने प्रवेश करावा. तर सदाचार हा आहे कि माणसाने ईश्वराच्या अप्रसन्नतेपासून स्वतःला वाचवावे. आणि घरांमध्ये पुढील प्रवेशद्वारामधून दाखल व्हा. आणि अल्लाहचे भय बाळगा जेणेकरून तुम्हाला यश लाभेल.
  190. आणि तुम्ही अल्लाहच्या मार्गात त्या लोकांशी लढा जे तुमच्याशी लढतात परंतु अतिरेक करू नका. अल्लाहला अतिरेक करणारे आवडत नाहीत.
  191. आणि त्यांच्याशी युद्ध करा जिथे कुठे तुमचा त्यांच्याशी सामना होईल. आणि त्यांना त्या ठिकाणाहून हाकलून लावा जिथून त्यांनी तुम्हाला हाकलले होते हे यासाठीच की जरी हत्या करणे वाईट असले तरी उपद्रव करणे हे त्यापेक्षाही वाईट आहे. पवित्र मसजीदीच्या (काबागृहाच्या) निकट जोपर्यंत ते तुमच्याशी युद्ध करणार नाहीत तोपर्यंत तुम्हीही त्यांच्याशी युद्ध करू नका. परंतु जेव्हा ते युद्ध करतील तेव्हा तुम्हीही त्यांच्याशी युद्ध करा. द्रोह करणार्‍यांसाठी हीच शिक्षा आहे.
  192. नंतर जर ते (युद्धापासून) परावृत्त झाले तर अल्लाह क्षमावंत व कृपावंत आहे.
  193. आणि जोपर्यंत उपद्रव नष्ट होऊन अल्लाहचाच धर्म प्रस्थापित होत नाही तोपर्यंत त्यांच्याशी युद्ध करा. मात्र जर ते परावृत्त झाले तर लक्षांत ठेवा की अत्याचार्‍यांशिवाय कुणाशीही शत्रुत्व उचित नाही.
  194. प्रतिष्ठित (युद्धासाठी) महिने हे प्रतिबंधित महिने आहेत त्यामुळे त्या प्रतिबंधांचे पालन सर्वांनी सारखेच केले पाहिजे. म्हणून (प्रतिबंधित महिन्यांत) जे तुमच्यावर हात उगारतील त्यांच्याविरूद्ध तुम्हीही हात उगारा. आणि ईश्वरी कोपाचे भय बाळगा. आणि लक्षांत ठेवा कि अल्लाह धर्मपरायण लोकांसोबत आहे.
  195. अल्लाहच्या मार्गात (संपत्ती) खर्च करा आणि आपल्या हाताने स्वतःचा विनाश ओढवून घेऊ नका. आणि सद्वर्तन करा अल्लाहला सद्वर्तन करणारेच आवडतात.
  196. आणि अल्लाहच्या (प्रसन्नते) साठी हज (मक्का यात्रा) आणि उमरा (हजचा कालावधी वगळता केलेली मक्का यात्रा) पूर्ण करा. जर कुठे वेढले गेलात तर जी कुर्बानी उपलब्ध असेल ती अल्लाहच्यासाठी कुर्बान (समर्पित) करा. मात्र तोपर्यंत तुम्ही डोक्यावरील केसांचे मुंडण करू नका जोपर्यंत ती कुर्बानी आपल्याजागी पोहचत नाही. परंतु ज्या व्यक्तीला आजारपणामुळे किंवा डोक्याच्या व्याधीमुळे डोक्यावरील केसांचे मुंडण करणे अशक्य झाले तर त्याने प्रतिदानाच्या रूपांत उपवासाचे पत करावे किंवा दान द्यावे किंवा कुर्बानी करावी. नंतर जर तुम्हाला सुलभता लाभली तर ज्याला हज करण्याची संधी लाभेल त्याने हज्जचा कालावधी येईपर्यंत उमरा करण्याचा लाभ घ्यावा. आणि आपल्या ऐपतीप्रमाणे कुर्बानी करावी आणि जर कुर्बानी करण्यास असमर्थ असेल तर हजच्या काळांत तीन उपवास करावेत आणि घरी परतल्यावर सात असे दहा रोजे पूर्ण करावेत. ही मुभा त्या लोकांकरिता आहे ज्यांची घरे मसजीदे हरामच्या (काबागृहाच्या) जवळ नसतील. आणि तुम्ही अल्लाहच्या अवज्ञेपासून अलिप्त रहा. लक्षात ठेवा की अल्लाह कठोर शिक्षा करणारा आहे.
  197. हज्जचे महिने नियत (निश्चित केलेले) आहेत. जी व्यक्ती ह्या निश्चित महिन्यामध्ये हज करण्याचे ठरवील तर त्याने वैषयिक वासनेपासून दूर रहावे. आणि अभद्र बोलू नये आणि भांडणतंटे करू नये. जे काही तुम्ही सत्कर्मे कराल ते अल्लाह जाणतो आहे आणि हज्जच्या काळांत सोबत शिदोरी घ्या. सर्वोत्तम शिदोरी म्हणजे अल्लाहचे भय बाळगणे होय. आणि हे ज्ञानीजनहो माझे भय बाळगा.
  198. आणि जर हज्जच्या काळांत तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या अनुग्रहाचा शोध घेतलांत तर त्यामध्ये काहीही गैर नाही. मग जेव्हा अरफातहून निघाल तेव्हा मशअरे हराम (मुजदलफह) च्या जवळ अल्लाहचे स्मरण करा. आणि अशातर्‍हेने स्मरण करा जसे त्याने तुम्हाला मार्गदर्शन केले आहे. अन्यथा यापूर्वी तर तुम्ही भरकटलेले होतात.
  199. तेव्हा जिथून सर्व लोक परततात तुम्ही सुद्धा तिथून परत या. आणि अल्लाहजवळ क्षमा याचना करा. निःसंशय तो क्षमावंत आणि दयावंत आहे.
  200. नंतर जेव्हा हज्जसंबंधीचा विधी तुम्ही पूर्ण कराल तेव्हा त्यानंतर तुम्ही अल्लाहचे स्मरण करा जसे तुम्ही आपल्या पूर्वजांचे स्मरण करीत होतात. किंबहुना त्याहीपेक्षा अधिक स्मरण करा, (परंतु अल्लाहचे स्मरण करणार्‍यांमध्येही खूप फरक आहे.) त्यांच्यापैकी काही तर असे आहेत जे म्हणतात कि, ’’हे आमच्या पालनकर्त्या, आम्हाला या लोकीच सर्वकाही दे. अशा व्यक्तीसाठी परलोकमध्ये काहीही वाट्याला येणार नाही.
  201. आणि काहीजण असे म्हणतात की, ``हे आमच्या पालनकर्त्या! आम्हाला या लोकीही चांगले फळ दे आणि परलोकामध्येही चांगले फळ दे आणि नरकाग्नीच्या यातनांपासून आम्हाला वाचव.''
  202. हेच ते लोक आहेत ज्यांनी आपल्या कर्मानुसार जे प्राप्त केले आहे त्यानुसार त्यांचा हिस्सा आहे आणि अल्लाह लवकरच हिशोब घेणार आहे.
  203. हे गणतीचे काही ठराविक दिवस आहेत जे तुम्ही अल्लाहच्या स्मरणामध्ये घालविले पाहिजेत. परंतु जो त्वरित दोनच दिवसांत परतला तर त्यामध्ये काहीही हरकत नाही आणि जर एखादा अधिक काळ थांबून परतला तर त्यामध्येही काही हरकत नाही. जर त्याने अल्लाहचे भय बाळगले असेल तेव्हा अल्लाहचे भय बाळगा आणि जाणून असा कि तुम्हाला त्याच्याकडे परत नेले जाईल.
  204. माणसामध्ये एखादा तर असा आहे की ऐहिक जीवनात ज्याच्या गोष्टी तुम्हाला मोहक वाटतात आणि आपल्या नेक नियतीवर तो वारंवार अल्लाहला साक्षी ठरवितो, परंतु वास्तविक पाहता तो सत्याचा अत्यंत वाईट शत्रू असतो.
  205. जेव्हा त्याला सत्ता प्राप्त होते, तेव्हा पृथ्वीतलावर त्याची सारी धावपळ केवळ याचकरिता असते की उपद्रव माजवावे, शेतीचा विध्वंस करावा व मानवजात नष्ट करावी - वास्तविक पाहता अल्लाह (ज्याला तो साक्षी ठरवीत होता) त्याला उपद्रव मुळीच आवडत नाही.
  206. आणि जेव्हा त्याला सांगितले जाते कि अल्लाहचे भय बाळग तेव्हा आपल्या प्रतिष्ठेच्या विचाराने तो गुन्ह्याकडे प्रवृत्त होतो. अशा व्यक्तीला नरकाचेच ठिकाण आहे. आणि ते अत्यंत वाईट स्थान आहे.
  207. माणसांमध्ये अशीही एखादी व्यक्ती असते कि तो आपल्या जीवाचे मोलही अल्लाहसाठी समर्पित करतो. अशा सेवकांवर अल्लाह अत्यंत प्रसन्न असतो.
  208. हे श्रद्धावंतांनो तुम्ही पूर्णपणे इस्लाममध्ये दाखल व्हा. आणि शैतानाच्या पाऊलवाटेचे अनुकरण करू नका. तो तुमचा उघड शत्रू आहे.
  209. जेव्हा तुमच्याकडे स्पष्ट मार्गदर्शन आले आणि यानंतरही तुम्ही डगमगू लागलात तर लक्षांत ठेवा कि अल्लाह अत्यंत प्रभुत्वशाली आणि न्यायकर्ता आहे-
  210. तेव्हा- काय ते ह्या गोष्टीच्या प्रतिक्षेत आहेत कि अल्लाहने मेघांच्या छत्रावर आरूढ होऊन देवदूतांच्या थव्यासह स्वतः येऊन निर्णय करावा? शेवटी सर्व गोष्टी अल्लाहपुढेच सादर होणार आहेत.
  211. इस्राईलच्या संततीला विचारा की आम्ही त्यांना किती स्पष्ट संकेत दिले. (शिवाय हेही विचारा की) अल्लाहची कृपा (ईश्वरीय मार्गदर्शन) प्राप्त झाल्यानंतर जो समाज त्या कृपेला विकृत करतो त्याला अल्लाह कशी कठोर शिक्षा देतो.
  212. ज्या लोकांनी नाकारण्याची नीति अवलंबिली त्यांच्यासाठी भौतिक जीवन अत्यंत प्रिय आणि मनाला आवडेल असे बनविलेले आहे. असे लोक श्रद्धावंतांचा उपहास करतात परंतु पुनरुत्थानाच्या दिवशी धर्मपरायण लोक त्यांच्या तुलनेने उच्च स्थानावर असतील. उरली भौतिक जीवनाची उपजीविका त्याविषयी अल्लाहला अधिकार आहे कि ज्याच्यासाठी इच्छिल त्याला अगणित देतो.
  213. प्रारंभी लोकांचा एकच समूहसमाज होता. तेव्हा अल्लाहने प्रेषित पाठविले शुभवार्ता देणारे आणि सावधान करणारे आणि त्यांच्यासोबत ग्रंथ अवतरले त्यांच्यामध्ये निर्णय करण्यासाठी ज्यामध्ये ते मतभेद करीत होते. मतभेद त्यांनी निर्माण केला ज्यांच्याकडे सत्याचे ज्ञान दिले होते. त्यांनी स्पष्ट मार्गदर्शन प्राप्त झाल्यानंतर आपसांतील दुराग्रहामुळे त्यांमध्ये मतभेद केले ज्यानी ईमान धारण केले त्याना अल्लाहने आपल्या हुकुमाने तो सत्यमार्ग दाखविला ज्यामध्ये लोकांनी मतभेद केला होता. अल्लाह ज्याला इच्छितो त्याला मार्ग दाखवितो.
  214. तेव्हा काय तुम्ही हे समजता कि तुम्ही सहजासहजी स्वर्गामध्ये दाखल व्हाल? वास्तविक अद्याप तुमच्यावर ते सर्वकाही ओढवले नाही जसे तुमच्या पूर्वीच्या लोकांवर ओढवले त्यांच्यावर कठीण प्रसंग ओढवले. आणि संकटे आली ह्यांना हादरवून सोडले इथपर्यंत की प्रेषित आणि त्यांचे सोबती ज्यांनी ईमान धारण केले होते ते म्हणू लागले कि अल्लाहची मदत केव्हा येईल? सावध व्हा अल्लाहची मदत जवळच आहे.
  215. लोक त्यांना (प्रेषितांना) विचारतात की आम्ही काय खर्च करावा? तुम्ही सांगा ’’जे काही तुम्ही खर्च कराल तो आईवडिलांवर, नातेवाईकांवर, अनाथ आणि गोरगरिबांवर आणि वाटसरूंवर खर्च करा आणि जे काही भले तुम्ही कराल ते अल्लाहला माहीत असेल.
  216. तुमच्यावर युद्ध नियत केले आणि तुम्हाला ते योग्य वाटत नाही परंतु शक्य आहे की जी गोष्ट तुम्हाला नापसंत असेल परंतु तीच तुमच्यासाठी अधिक चांगली असेल आणि हेही शक्य आहे की जी गोष्ट तुम्हाला पसंत असेल ती तुमच्यासाठी वाईट असेल. अल्लाह जाणतो तुम्ही जाणत नाही.
  217. तुला विचारतात की ’हराम’ महिन्यांत युद्ध करणे कसे आहे? तू सांग कि त्या महिन्यांत युद्ध करणे मोठा अपराध आहे. परंतु अल्लाहच्या मार्गापासून अडविणे आणि अल्लाहला नाकारणे आणि मस्जिदे हरामचा (काबागृहाचा) मार्ग अडविणे आणि काबागृहाच्या परिसरांतील लोकांना तेथून बाहेर काढणे अल्लाहच्या निकट यापेक्षाही वाईट आहे आणि अनाचार हा हत्येपेक्षाही वाईट आहे. ते सदैव तुमच्याशी युद्ध करीत राहतील इथपर्यंत कि जर ते करू शकतील तर तुम्हाला तुमच्या धर्मापासून परावृत्त करतील. आणि तुमच्यापैकी जे लोक आपल्या धर्माकडे पाठ फिरवतील आणि नाकारण्याच्याच परिस्थितीत मरेल त्याचे भौतिक आणि मरणोत्तर दोन्ही जीवनांतील आचरण व्यर्थ होईल. हेच ते लोक आहेत जे नरकवासी आहेत आणि सदैव नरकातच खितपत पडतील.
  218. आणि ज्या लोकांनी ईमान धारण केले आणि ज्यांनी अल्लाहच्या मार्गात घरादाराचा त्याग केला आणि लढा दिला हेच लोक अल्लाहच्या कृपेची आशा करतात. आणि अल्लाह क्षमावंत आणि दयावंत आहे.
  219. ते तुम्हाला दारू आणि जुगाराविषयी विचारतात. त्यांना सांगा की दोन्हीमध्ये मोठा अपराध आहे. जरी त्यामध्ये लोकांसाठी काही लाभ आहे परंतु त्यांचा अपराध त्यांच्या लाभापेक्षा अधिक मोठा आहे. ते तुम्हाला विचारतात की काय खर्च करावा? सांगा की जे काही आवश्यकतेपेक्षा अधिक असेल. अशा प्रकारे अल्लाह तुम्हाला आपली संकेतवचने स्पष्ट करून सांगत आहे जेणेकरून तुम्ही चिंतन करावे भौतिक आणि मरणोत्त्तर जीवनाचे.
  220. ते तुम्हाला अनाथांविषयी विचारतात. त्याना सांगा कि त्यांच्या उद्धारासाठी जो काही अवलंब कराल तो उत्तम असेल आणि त्याना तुम्ही आपल्यासोबत सामील कराल तर ते तुमचे भाऊबंदच आहेत. आणि अल्लाह अनाचारी आणि सुधारणावाद्यांना चांगल्याप्रकारे जाणतो. आणि अल्लाहने इच्छिले असते तर तुम्हाला त्याने अडचणींत टाकले असते निःसंशय अल्लाह प्रभुत्वशाली आणि तत्वदर्शी आहे.
  221. आणि अनेकेश्वरवादी स्त्रीयांशी विवाह करू नका जोपर्यंत त्या इमान धारण करीत नाहीत तथापि मुसलमान दासी कोणत्याही अनेकेश्वरवादी मर्यादाशील स्त्रीपेक्षा अधिक उत्तम आहे. जरी तुम्हाला ती अधिक पसंत असेल. आणि आपल्या स्त्रीयांचे विवाह अनेकेश्वरवादी पुरुषांशी करू नका. इथपर्यंत कि ते श्रद्धा ठेवीत नाहीत. एक श्रद्धावंत गुलाम अनेकेश्वरवादी पुरुषापेक्षा अधिक उत्तम आहे जरी तुम्हाला तो चांगला वाटत असेल. हे लोक तुम्हाला अग्नीकडे बोलावीत आहेत आणि तो आपल्या आज्ञेद्वारे तुम्हाला स्वर्गाकडे व क्षमेकडे बोलवीत आहे आणि तो आपले आदेश स्पष्टपणे लोकांसमोर विषद करीत आहे जेणेकरून त्यांनी बोध घ्यावा.
  222. विचारतात की ऋतुस्रावाविषयी कोणता आदेश आहे? सांग त्यांना की ती क्लेशदायक अवस्था आहे तेव्हा तुम्ही ऋतुस्रावाच्या काळांत त्यांच्यापासून दूर रहा आणि जोपर्यंत ऋतुस्नान करीत नाहीत तोपर्यंत त्यांच्याजवळ जाऊ नका आणि जेव्हा त्या ऋतुस्नात होतील त्यानंतर अल्लाहने हुकुम दिला आहे त्याप्रमाणे त्यांच्या जवळ जा. निःसंशय अल्लाहला पश्चाताप करणारे आवडतात. आणि पावित्र्य राखणारेही त्याला आवडतात.
  223. तुमच्या पत्नी तुमच्यासाठी शेती (तुमचा वंशवृद्धि करणार्‍या जननी) आहेत. जेव्हा तुमची इच्छा होईल तेव्हा (वंशवृद्धिच्या भावनेने) तिच्याकडे जा. आणि आपला वंश पुढे चालवा आणि ईश्वरी कोपचे भय बाळगा. आणि जाणून असा की तुमची त्याच्याशी भेट होणार आहे. आणि श्रद्धावंतांना शुभवार्ता सांगा.
  224. अल्लाहच्या नांवाचा उपयोग अशा शपथग्रहण करण्यासाठी उपयोग करू नका की त्यामुळे सदाचार, धर्मपरायणता आणि लोककल्याणाच्या कार्यापासून तुम्ही परावृत्त व्हाल. अल्लाह तुमच्या सर्व गोष्टी ऐकणारा आणि जाणणारा आहे.
  225. अल्लाह तुम्हाला तुमच्या निरर्थक शपथांबद्दल पकडणार नाही परंतु ज्या शपथा तुम्ही प्रामाणिकपणे घेता त्याविषयी तुम्हाला अवश्य विचारले जाईल. अल्लाह अत्यंत क्षमावंत आणि सहनशील आहे.
  226. जे लोक आपल्या पत्नीशी संबंध न ठेवण्याची शपथ घेतात त्यांच्यासाठी चार महिन्यांचा अवधी आहे. जर त्यांनी पुन्हा संबंध प्रस्थापित केले तर अल्लाह क्षमावंत व कृपावंत आहे.
  227. आणि जर त्यांनी तलाकचाच विचार केला असेल तर लक्षांत ठेवा अल्लाह सर्वकाही ऐकणारा व जाणणारा आहे.
  228. ज्या स्त्रीयांना तलाक दिली गेली असेल त्यांनी तीन ऋतुस्रावापर्यंतच्या काळापर्यंत प्रतिक्षा करावी. आणि त्यांच्यासाठी हे वैध नाही कि अल्लाहने त्यांच्या गर्भाशयांत जे काही घडविले आहे ते त्यांनी लपवावे त्यांनी मुळीच तसे करू नये. जर त्या अल्लाह आणि अंतीम दिनावर विश्वास ठेवीत असतील. त्यांचे पती त्यांच्याशी संबंध सुधारण्यास तयार असतील तर ते या इद्दतच्या काळात त्यांना आपल्या पत्नी म्हणून परत स्वीकार करण्याचे हक्कदार आहेत. आणि याबाबतीत स्त्रियांना त्याचप्रमाणे हक्क आहे परिचित पद्धतीनुसार जसे पुरुषांना आहे. मात्र पुरुषांसाठी स्त्रियांपेक्षा एक दर्जा अधिक आहे. अल्लाह प्रभुत्वशाली आणि विवेकी आहे.
  229. तलाक फक्त दोन वेळा आहे नंतर त्याना एकतर सर्वसंमत पद्धतीने आपल्याजवळ ठेवून घ्या किंवा सन्मानपूर्वक त्यांना निरोप द्या. आणि तुमच्यासाठी हे वैध नाही की जे काही तुम्ही त्यांना दिले आहे त्यातून काहीही परत घ्यावे. अपवाद फक्त जर त्या दोघांना भय वाटत असेल की अल्लाहने घालून दिलेल्या मर्यादांचे ते पालन करू शकत नाहीत. नंतर जर तुम्हाला भय वाटत असेल की ते दोघे अल्लाहने घालून दिलेल्या मर्यादांवर कायम राहू शकत नसतील तर त्यांच्यामध्ये असा समेट घडविण्यामध्ये कोणताही अपराध नाही की पत्नीने आपल्या पतीला प्रतिदान देऊन स्वतःला मुक्त करून घ्यावे. ह्या अल्लाहने घालून दिलेल्या मर्यादा आहेत त्याचे उल्लंघन करू नका आणि जे ह्या मर्यादांचे उल्लंघन करतील ते निःसंशय अत्याचारी आहेत.
  230. नंतर जर (दोन वेळा तलाक दिल्यानंतर पतीने आपल्या पत्नीला तिसर्‍यांदा) तलाक दिला तर ती स्त्री त्याच्यासाठी वैध नाही जोपर्यंत तिचा दुसर्‍या पुरुषाशी विवाह होऊन त्यानंतर तो पुरुष तिला तलाक देईल. तसेच त्या पहिल्या पतीला आणि या स्त्रीला वाटत असेल की अल्लाहने घालून दिलेल्या मर्यादांचे आपण पालन करू शकू तरच त्यांना पुन्हा विवाह करून वैवाहिक जीवन जगता येईल. या अल्लाहने घालून दिलेल्या मर्यादा आहेत. ज्या तो लोकांच्या मार्गदर्शनासाठी स्पष्ट करीत आहे जे (त्याच्या मर्यादा भंग करण्याचा परिणाम) जाणतात.
  231. आणि जेव्हा तुम्ही पत्नींना तलाक द्याल व त्या आपला प्रतिक्षाकाळ पूर्ण करतील तेव्हा सर्वसंमत पद्धतीने त्यांना आपल्याजवळ ठेवून घ्या किंवा सन्मानपूर्वक त्यांना निरोप द्या. आणि त्यांना त्रास देण्यासाठी अडकवून ठेवू नका. जेणेकरून तुम्ही त्यांच्यावर अत्याचार करावा. यात अतिरेक करणारा स्वतःवरच अत्याचार करील. अल्लाहच्या संकेतवचनांशी खेळ करू नका. आणि अल्लाहने तुमच्यावर केलेल्या ऋणांची आठवण ठेवा. आणि तुम्हाला उपदेश करीत आहे की जो ग्रंथ आणि विवेक त्याने तुमच्यावर अवतरला आहे त्याचा आदर करा. आणि अल्लाहच्या कोपाचे भय बाळगा आणि जाणून असा की अल्लाह प्रत्येक गोष्ट जाणतो आहे.
  232. जेव्हा तुम्ही आपल्या पत्नींना तलाक द्याल आणि त्या प्रतिक्षाकाळ पूर्ण करतील तेव्हा त्यांच्या नियोजित वराशी विवाह करण्यापासून प्रतिबंध करू नका. जेव्हा ते संमत्तीपूर्वक एकमेकांशी विवाह करू इच्छित असतील. तुम्हाला उपदेश देण्यात येत आहे की असे कृत्य मुळीच करू नका जर तुम्ही अल्लाह आणि अंतीम दिनावर श्रद्धा ठेवणारे असाल. तुमच्यासाठी पवित्र आणि पावन पद्धत हीच आहे की तुम्ही यापासून परावृत्त रहावे अल्लाह जाणतो पण तुम्ही जाणत नाही.
  233. ज्या माता-पित्यांची इच्छा असेल की त्यांच्या मुलांनी स्तनपान-काल पूर्ण होईपर्यंत दूध प्यावे तर मातांनी - आपल्या मुलांना पूर्ण दोन वर्षे स्तनपान करावे. अशा अवस्थेत मुलाच्या पित्याने परिचित पद्धतीनुसार त्यांना जेवण-खाण व कपडे-लत्ते दिले पाहिजेत. परंतु कोणावरही त्याच्या ऐपतीपेक्षा जास्त भार टाकला जाऊ नये. आईला या कारणास्तव त्रास दिले जाऊ नये की मूल तिचे आहे, आणि पित्यालासुद्धा या कारणास्तव त्रास दिला जाऊ नये की मूल त्याचे आहे - दूध पाजणार्‍या स्त्रीचा हा हक्क जसा मुलाच्या पित्यावर आहे, तसाच त्याच्या वारसांवर देखील आहे. - परंतु जर उभयपक्ष परस्पर राजी-खुषी आणि सल्ला-मसलतीने दूध सोडवू इच्छित असतील तर असे करण्यास काही हरकत नाही. तुमचा विचार जर आपल्या मुलांना एखाद्या परक्या स्त्रीकडून दूध पाजावयाचा असेल तर यातसुद्धा काही हरकत नाही परंतु केवळ या अटीवर की त्याचा जो काही मोबदला ठरवाल, तो परिचित पद्धतीनुसार अदा करा. अल्लाहच्या कोपाचे भय बाळगा आणि समजून असा की जे काही तुम्ही करता ते सर्व अल्लाहच्या दृष्टीत आहे.
  234. तुमच्यापैकी जे लोक मरण पावतील, जर त्यांच्या पाठीमागे त्यांच्या पत्नीं जिवंत असतील तर त्यांनी चार महिने दहा दिवस स्वतःला रोखून ठेवावे, नंतर जेव्हा त्यांची इद्दत पूर्ण होईल तेव्हा त्यांना अधिकार आहे की त्यांनी स्वतःसंबंधी भल्या पद्धतीनुसार इच्छा असेल तसे करावे. तुमच्यावर त्याची काहीही जबाबदारी नाही अल्लाह तुम्हा सर्वांच्या आचरणाची खबर राखणारा आहे
  235. इद्दतच्या काळात तुम्ही हवे तर त्या विधवा स्त्रियांशी मागणीची इच्छा संकेताने व्यक्त करा, हवे तर मनांत लपवून ठेवा, दोन्ही स्वरूपात काही हरकत नाही. अल्लाह जाणतो की त्याचा विचार तुमच्या मनात येणारच. परंतु पहा, गुप्त करार-मदार करू नका. जर काही बोलणी करावयाची असेल तर प्रचलित पद्धतीनुसार करा आणि विवाहबद्ध होण्याचा निर्णय तोपर्यंत घेऊ नका जोपर्यंत इद्दत पूर्ण होत नाही. चांगल्या प्रकारे समजून घ्या की अल्लाह तुमची मनोदशा देखील जाणतो. म्हणून त्याचे भय बाळगा व हे देखील जाणून असा की अल्लाह सहनशील आहे (लहानसहान गोष्टींना) तो माफ करतो.
  236. तुम्हावर काही गुन्हा नाही की तुमच्या पत्नींना तुम्ही तलाक द्यावा या वेळेपूर्वी की त्यांना स्पर्श करण्याची घटका येईल अथवा महर ठरविला असेल. अशा स्थितीत त्यांना काही ना काही अवश्य दिले पाहिजे. सुखवस्तु व्यक्तीने आपल्या ऐपतीप्रमाणे व गरीबाने आपल्या कुवतीप्रमाणे परिचित पद्धतीनुसार द्यावे. हा हक्क आहे सदाचारी लोकांवर.
  237. आणि जर तुम्ही स्पर्श करण्यापूर्वी तलाक दिला असेल परंतु महर ठरविण्यात आला असेल, तर अशा स्थितीत महरचा अर्धा भाग द्यावा लागेल. ही बाब वेगळी आहे की स्त्रीने उदारता दाखवावी (आणि महर घेऊ नये) किंवा त्या पुरुषाने ज्याच्या अधिकारात वैवाहिक बंध आहे, उदारता दाखवावी (आणि संपूर्ण महर द्यावा) आणि तुम्ही (अर्थात पुरुष) उदारतेचा व्यवहार करावा तर हा व्यवहार अल्लाहच्या प्रकोपाला भिऊन वागण्यासाठी अधिक सुसंगत आहे. परस्पर व्यवहारामध्ये औदार्याचा विसर पडू देऊ नका. तुमच्या कृती अल्लाह पाहात आहे.
  238. आपल्या नमाजांची काळजी घ्या. विशेषतः अशा नमाजाची की जिच्यांत नमाजची सर्व वैशिष्ट्ये एकवटलेली आहेत. अल्लाहसमोर असे उभे रहा जसे आज्ञाधारक गुलाम उभे राहतात.
  239. अशांततेची परिस्थिती असेल तर तुम्ही पायी असा किंवा स्वार असा, जमेल तशी नमाज अदा करा. आणि जेव्हा शांती लाभेल तेव्हा अल्लाहचे त्या पद्धतीने स्मरण करा जसे त्याने तुम्हाला शिकविले आहे, ज्याची तुम्हाला पूर्वी माहिती नव्हती.
  240. तुम्हांपैकी जे लोक मरण पावतील आणि पाठीमागे पत्नीं सोडतील त्यांना हे आवश्यक आहे की त्यांनी आपल्या पत्नींसाठी असे मृत्यूपत्र (वसीयत) करून जावे की एक वर्षापर्यंत त्यांना उदरनिर्वाहाची सामुग्री देण्यात यावी व त्यांना घरातून बाहेर काढले जाऊ नये. नंतर जर त्या स्वतः निघून गेल्या तर स्वतःसंबंधी प्रचलित पद्धतीनुसार त्या जे काही करतील त्याची कोणतीही जबाबदारी तुमच्यावर नाही, अल्लाह प्रभुत्वसंपन्न आणि बुद्धिमान व विवेकशील आहे.
  241. अशाच तर्‍हेने ज्या स्त्रियांना घटस्फोट देण्यात आला असेल त्यांना देखील योग्य प्रकारे काहीना काही देऊन निरोप देण्यात यावा. हा हक्क आहे अल्लाहचे भय बाळगणार्‍या लोकांवर.
  242. अशा प्रकारे अल्लाह तुम्हाला आपल्या आज्ञा स्पष्टपणे निर्देशित करतो. आशा आहे की तुम्ही समजूनउमजून कृती कराल.
  243. तुम्ही त्या लोकांच्या दशेचा विचार केला जे मृत्यूच्या भीतीने आपले घरदार सोडून निघाले होते आणि हजारोंच्या संख्येत ते होते? अल्लाहने त्यांना फर्माविले, मरा! नंतर त्याने त्यांना पुनरुज्जीवन दिले. वस्तुस्थिती अशी आहे की अल्लाह मानवावर मोठी कृपा करणारा आहे, परंतु बहुसंख्य लोक कृतज्ञता व्यक्त करीत नाहीत.
  244. मुसलमानांनो! अल्लाहच्या मार्गात युद्ध करा आणि चांगलेच समजून असा की अल्लाह ऐकणारा व जाणणारा आहे.
  245. तुमच्यात असा कोण आहे की जो अल्लाहला चांगले कर्ज देईल की अल्लाह त्याला कित्येक पटीने वाढवून परत करील? घट करणेसुद्धा अल्लाहच्या अखत्यारीत आहे आणि वाढविणे देखील, आणि त्याच्याकडेच तुम्हाला परत जावयाचे आहे.
  246. मग तुम्ही त्या घटनेवर विचार केला जी मूसा (अ.) च्या नंतर बनीइस्राईलच्या सरदारांच्या बाबतीत घडली होती? त्यांनी आपल्या नबीला सांगितले, ’’आमच्यासाठी राजा नेमून टाका की ज्यामुळे आम्ही अल्लाहच्या मार्गात युद्ध करावे.’’ नबीने विचारले, ’’असे तर होणार नाही ना की तुम्हाला युद्धाचा आदेश देण्यात यावा आणि मग तुम्ही लढू नये?’’ ते सांगू लागले, ’’बरे हे कसे होऊ शकते की आम्ही अल्लाहच्या मार्गात लढू नये जेव्हा आम्हाला आमच्या घरातून काढण्यात आले आहे आणि आमची मुले-बाळे आम्हापासून वेगळी केली गेली आहेत.’’ परंतु जेव्हा त्यांना युद्धाचा आदेश दिला गेला तेव्हा एक अल्पशा संख्येशिवाय इतर सर्वजणांनी पाठ फिरविली आणि अल्लाह त्यांच्यापैकी प्रत्येक अत्याचार्‍याला चांगलेच ओळखतो.
  247. त्यांच्या प्रेषिताने त्यांना सांगितले की अल्लाहने तुमच्यासाठी तालूतला बादशाह नेमले आहे. हे ऐकून ते म्हणाले, ’’आमच्यावर बादशाह बनण्याचा तो कसा हक्कदार बनला? त्याच्या तुलनेत बाहशाह होण्याचे आम्ही जास्त हक्कदार आहोत. तो तर काही मोठा श्रीमंत नाही.’’ प्रेषित उत्तरले, ’’अल्लाहने तुमच्या तुलनेत त्यालाच निवडले आहे आणि त्याला बौद्धिक व शारीरिक दोन्ही प्रकारच्या क्षमता विपुल प्रमाणात बहाल केल्या आहेत. आणि अल्लाहला हा अधिकार आहे की त्याने आपला मुलुख हवे त्याला द्यावा. अल्लाह सर्वव्यापी व सर्वज्ञ आहे.’’
  248. याचबरोबर त्यांच्या नबीने असेही सांगितले की, ’’ईश्वराकडून तो बादशाह म्हणून नियुक्त होण्याचे लक्षण हे आहे की त्याच्या कारकिर्दीत ती पेटी तुम्हाला परत मिळेल ज्यामध्ये तुमच्या पालनकर्त्याकडून तुमच्यासाठी मनःशांतीची सामग्री आहे, ज्यामध्ये मूसाचे वंशज व हारूनच्या वंशजानी सोडलेले पवित्र अवशेष आहेत आणि ज्याला आता दूतांनी उचलले आहे, जर तुम्ही श्रद्धावंत असाल तर तुमच्यासाठी ही मोठी खूण आहे.’’
  249. नंतर जेव्हा तालूत लष्कर घेऊन निघाला तेव्हा त्याने सांगितले, ’’एका नदीवर अल्लाहकडून तुमची परीक्षा घेतली जाणार आहे. जो तिचे पाणी पिईल तो माझा सोबती नव्हे. माझा सोबती तर केवळ तोच आहे जो आपली तहान त्याने भागविणार नाही. परंतु जर एखादा, एखादी ओंजळभर प्याला तर हरकत नाही.’’ पण एका अल्पशा गटाखेरीज ते सर्वजण त्या नदीच्या पाण्याने तृप्त झाले. मग जेव्हा तालूत व त्याचे मुसलमान साथीदार नदी ओलांडून पुढे निघाले, तेव्हा त्यांनी तालूतला सांगितले की, आज आमच्यात जालूत व त्याच्या लष्कराशी सामना देण्याची शक्ती नाही. परंतु जे लोक असे समजत होते की एके दिवशी त्यांना अल्लाहशी भेटावयाचे आहे. त्यांनी सांगितले, ’’अनेकदा असे घडले आहे की एक लहानसा गट अल्लाहच्या आज्ञेने एका मोठ्या गटावर प्रभावी ठरला आहे, अल्लाह सहनशील लोकांचा सहाय्यक आहे.’’
  250. आणि जेव्हा ते जालूत व त्याच्या लष्कराशी सामना देण्यासाठी निघाले तेव्हा त्यांनी प्रार्थना केली, ’’हे पालनकर्त्या, आमच्यावर सहनशीलतेचा वर्षाव कर, आमचे पाय स्थिर कर आणि त्या अश्रद्धावंत समुदायावर आम्हाला विजयी कर.’’
  251. सरतेशेवटी अल्लाहच्या आज्ञेने त्यांनी अश्रद्धावंतांना पिटाळून लावले आणि दाऊदने जालूतला ठार केले आणि अल्लाहने त्याला राज्य व विवेकाने उपकृत केले आणि ज्या ज्या गोष्टी अल्लाहने इच्छिल्या त्यांचे ज्ञान त्याला दिले.- जर अल्लाह अशा प्रकारे मानवाच्या एका समुदायाला दुसर्‍या समुदायाच्या हस्ते हटवीत नसता तर पृथ्वीची व्यवस्था बिघडली असती - परंतु जगातील लोकांवर अल्लाहची मोठी कृपा आहे की (तो अशा तर्‍हेने हिंसाचाराच्या विनाशाची व्यवस्था करीत असतो.)
  252. ही अल्लाहची वचने आहेत जी आम्ही तुम्हाला ठीक-ठीक ऐकवीत आहोत, आणि हे मुहम्मद (स.) निःसंशय तुम्ही त्या लोकांपैकी आहात ज्यांना प्रेषित बनवून पाठविले गेले आहे
  253. हे प्रेषित (जे आमच्याकडून मानवाच्या मार्गदर्शनाकरिता नियुक्त झाले) आम्ही यांना एक दुसर्‍यापेक्षा वरचढ दर्जे बहाल केले. यांच्यापैकी कोणी असा होता ज्याच्याशी स्वतः अल्लाहने संभाषण केले, कुणाला त्याने दुसर्‍या प्रकारे उच्च दर्जे प्रदान केले आणि शेवटी मरयमपूत्र ईसा-येशू (अ.) यांना दिव्य संकेत बहाल केले आणि पवित्र आत्म्याने त्याला सहाय्य केले. जर अल्लाहने इच्छिले असते तर शक्य नव्हते की या प्रेषितानंतर ज्या लोकांनी उज्ज्वल संकेत पाहिले असते त्यांनी आपसात लढाई केली असती परंतु (अल्लाहचे मनोरथ असे नव्हते की त्याने लोकांना सक्तीने मतभेदापासून रोखावे. या कारणाने) त्यांनी आपसात मतभेद निर्माण केले मग कोणी श्रद्धा ठेवली व कोणी द्रोहाचा मार्ग अवलंबिला. होय, अल्लाहने इच्छिले असते तर ते कदापि लढले नसते परंतु अल्लाह जे इच्छितो ते करतो.
  254. हे श्रद्धावंतांनो, जी काही धन-दौलत आम्ही तुम्हाला बहाल केली आहे त्यातून खर्च करा यापूर्वी की तो दिवस येईल ज्यामध्ये खरेदी-विक्री होणार नाही, मित्रताही उपयोगी पडणार नाही आणि शिफारस देखील चालणार नाही. आणि खरे अत्याचारी तेच आहेत जे द्रोहाचा मार्ग अवलंबितात.
  255. अल्लाह तो चिरंतनजीवी आहे ज्याने तमाम सृष्टीचा भार सांभाळलेला आहे, त्याच्याशिवाय इतर कोणीही ईश्वर नाही, तो झोपतही नाही आणि त्याला झोपेची गुंगीही येत नाही, पृथ्वी आणि आकाशांत जे काही आहे त्याचेच आहे. असा कोण आहे जो त्याच्या पुढे त्याच्या परवानगीशिवाय शिफारस करू शकेल? जे काही दासांच्या समक्ष आहे त्यालाही तो जाणतो आणि जे काही त्यांच्यापासून अदृश्य आहे त्यालाही तो जाणतो आणि त्याच्या माहितीपैकी कोणतीही गोष्ट त्यांच्या बुद्धिकक्षेत येऊ शकत नाही याव्यतिरिक्त की एखाद्या गोष्टीचे ज्ञान तो स्वतःच त्यांना देऊ इच्छित असेल. त्याचे राज्य आकाश आणि पृथ्वीवर पसरले आहे, आणि त्यांचे संरक्षण काही त्याला थकवून सोडणारे काम नव्हे. फक्त तोच एकटा महान व श्रेष्ठ आहे.
  256. धर्माच्या बाबतीत कोणतीही जोरजबरदस्ती नाही. सत्य असत्यापासून वेगळे केले गेले आहे. आता ज्याने कोणी, तागूत चा इन्कार करून अल्लाहवर श्रद्धा ठेवली त्याने एक असा मजबूत आधार ग्रहण केला जो कधीही तुटणार नाही, आणि अल्लाह (ज्याचा आधार त्याने घेतला आहे) सर्वकाही ऐकणारा व जाणणारा आहे.
  257. जे लोक श्रद्धा ठेवतात त्यांचा समर्थक व सहायक अल्लाह आहे आणि तो त्यांना अंधारातून काढून प्रकाशात आणतो. आणि जे लोक द्रोहाचा मार्ग अवलंबितात त्यांचे समर्थक व सहायक तागूत आहेत. आणि ते त्यांना प्रकाशापासून ओढून अंधाराकडे घेऊन जातात. हे नरकाग्नीमध्ये जाणारे लोक आहेत जेथे हे सदैव राहतील.
  258. तुम्ही त्या माणसाच्या अवस्थेवर विचार केला नाही काय की ज्याने इब्राहीम (अ.) शी वाद घातला होता? वाद याबाबतीत की इब्राहीम (अ.) चा पालनकर्ता कोण आहे, आणि या कारणास्तव की त्या माणसाला अल्लाहने राज्य-सत्ता देऊन टाकली होती. जेव्हा इब्राहीम (अ.) नी सांगितले की, ’’माझा पालनकर्ता तो आहे ज्याच्या अखत्यारीत जीवन व मृत्यू आहे.’’ तेव्हा त्याने उत्तर दिले, ’’जीवन व मृत्यू माझ्या अधिकारात आहे.’’ इब्राहीम (अ.) ने सांगितले, ’’असे होय, तर अल्लाह, सूर्य पूर्वेकडून उदयास आणतो, तू जरा त्याला पश्चिमेकडून उदयास आणून दाखव.’’ हे ऐकून तो सत्याचा इन्कार करणारा आश्चर्यचकित झाला, परंतु अल्लाह अत्याचार्‍यांना सरळ मार्ग दाखवीत नसतो.
  259. अथवा उदाहरण म्हणून त्या माणसाकडे पहा ज्याचे एका अशा वस्तीवरून जाणे झाले जी आपल्या छतांवर कोलमडून पालथी पडलेली होती. त्याने सांगितले, ’’ही वस्ती, जी नाश पावली आहे हिला अल्लाह कशाप्रकारे पुन्हा जीवन प्रदान करील?’’ यावर अल्लाहने त्याचे प्राण काढून घेतले आणि तो शंभर वर्षांपर्यंत मृतावस्थेत पडून राहिला. नंतर अल्लाहने त्याला पुन्हा जीवन दिले आणि त्याला विचारले, ’’सांग तू किती काळ पडून राहिला आहेस?’’ त्याने उत्तर दिले, ’’एक दिवस अथवा काही तास राहिलो असेन.’’ फर्माविले, ’’तुझ्यावर याच स्थितीत शंभर वर्षे व्यतीत झाली आहेत. आता जरा आपल्या अन्न आणि पाण्याकडे पहा, त्यांच्यात जरा देखील फरक पडलेला नाही. दुसरीकडे आपल्या गाढवाकडे देखील बघ, (की त्याच्या हाडांचा सापळा देखील जर्जर झाला आहे) आणि हे आम्ही यासाठी केले आहे की आम्ही तुला लोकांकरिता एक निशाणी बनवू इच्छितो. मग पाहा की हाडांच्या या सापळ्याला आम्ही कशा प्रकारे उत्थापित करून त्याच्यावर मांस व कातडी चढवितो.’’ अशा प्रकारे जेव्हा सत्य स्थिती त्याच्यासमोर पूर्णपणे प्रकट झाली तेव्हा तो म्हणाला, ’’मला माहीत आहे की अल्लाह प्रत्येक गोष्टीवर प्रभुत्व राखतो.’’
  260. आणि तो प्रसंग देखील नजरेसमोर असू द्या जेव्हा इब्राहीम (अ.) यांनी सांगितले होते की, ’’माझ्या पालनकर्त्या! मला दाखव की तू मृतांना कशा प्रकारे जिवंत करतोस.’’ फर्माविले, ’’काय तुझी यावर श्रद्धा नाही?’’ त्याने सांगितले, ’’श्रद्धा तर आहेच परंतु मनाचे समाधान इच्छितो.’’ फर्माविले, ’’बरे तर चार पक्षी घे आणि त्यांना आपल्याशी माणसाळून टाक. नंतर त्यांचा एकएक तुकडा तू एकाएका पर्वतावर ठेवून दे. नंतर त्यांना हांक दे. ते तुझ्याकडे धावत येतील. चांगले समजून घे की अल्लाह अत्यंत सामर्थ्यवान आणि बुद्धिमान आहे.’’
  261. जे लोक आपला माल अल्लाहच्या मार्गात खर्च करतात, त्यांच्या खर्चाचे उदाहरण असे आहे जसे एक बी पेरली जावी आणि तिच्यातून सात कणसे यावीत आणि प्रत्येक कणसांत शंभर दाणे असावेत. अशाच तर्‍हेने अल्लाह ज्याच्या कृतीला इच्छितो त्याला समृद्धी प्रदान करतो. तो उदारहस्त देखील आहे आणि जाणणारासुद्धा.
  262. जे लोक आपला माल अल्लाहच्या मार्गात खर्च करतात आणि खर्च केल्यानंतर मग उपकार दर्शवीत नाहीत आणि दुःख देत नाहीत त्यांचा मोबदला त्यांच्या पालनकर्त्याजवळ आहे आणि त्यांच्याकरिता कोणताही दुःख आणि भयाचा प्रसंग नाही.
  263. एक मधुर बोल आणि एखाद्या असह्य गोष्टीकडे थोडीशी डोळेझांक त्या दानापेक्षा श्रेष्ठ आहे ज्याच्या पाठीमागे दुःख असेल. अल्लाह निरपेक्ष आहे आणि सहनशीलता त्याचा विशेष गुण आहे.
  264. हे श्रद्धावंतांनो, आपले दान, उपकार दाखवून आणि दुःख देऊन त्या माणसासारखे मातीत मिसळू नका जो आपली संपत्ती केवळ लोकांना दाखविण्यासाठी खर्च करतो, आणि अल्लाहवरही श्रद्धा ठेवत नाही आणि परलोकावर सुद्धा. त्याच्या खर्चाचे उदाहरण असे आहे जणू एक खडक होता, ज्याच्यावर मातीचा थर जमलेला होता त्यावर जेव्हा जोराची वृष्टी झाली तेव्हा सर्व माती वाहून गेली आणि स्वच्छ खडक ते खडकच उरले. असे लोक आपल्याठायी दान देऊन जे पुण्य कमवितात, त्यापासून त्यांच्या हाती काहीही लागत नाही आणि अश्रद्धावंतांना सरळ मार्ग दाखविणे हा अल्लाहचा शिरस्ता नव्हे.
  265. याउलट जे लोक आपली संपत्ती केवळ अल्लाहची मर्जी संपादन करण्याकरिता मानसिक धैर्य व संतोषाने खर्च करतात त्यांच्या खर्च करण्याचे उदाहरण असे आहे जसे एखाद्या पठारावर एक बाग असावी, जर जोरदार वृष्टी झाली तर दुपटीने फळे यावीत व जरी जोराची वृष्टी झाली नाही तरीसुद्धा केवळ एक हलकासा तुषार देखील त्याकरिता पुरेसा व्हावा. जे काही तुम्ही करता ते सर्व अल्लाहच्या दृष्टीत आहे.
  266. तुम्हापैकी कोणी हे पसंत करतो काय की त्याच्याजवळ द्राक्षे आणि सर्व प्रकारच्या फळांनी बहरलेली बाग असावी आणि ती ऐन वेळी एका जोरदार वावटळीच्या मार्‍यात सापडून उध्वस्त व्हावी ज्या वेळेस तो स्वतः वृद्ध झाला असेल आणि त्याची अल्पवयीन मुले या वेळेस काही योग्यतेची नसतील? अशा प्रकारे अल्लाह आपल्या गोष्टी तुमच्यासमोर स्पष्टपणे समजावून सांगतो कदाचित तुम्ही मनन चिंतन करावे.
  267. हे श्रद्धावंतांनो! जी संपत्ती तुम्ही कमविली आहे आणि जे काही आम्ही जमिनीतून तुमच्याकरिता उत्पन्न केले आहे, त्यापैकी उत्कृष्ट भाग अल्लाहच्या मार्गात खर्च करा. असे होता कामा नये की त्याच्या मार्गात देण्याकरिता निकृष्टतम प्रतीची वस्तू निवडण्याचा तुम्ही प्रयत्न करावा, वास्तविक पाहता तीच वस्तू जर एखाद्याने तुम्हाला देऊ केली तर तुम्ही ती घेणे मुळीच पसंत करणार नाही याखेरीज की तुम्ही ते स्वीकारण्यात डोळेझांक कराल. तुम्ही समजून असावे की अल्लाह निरपेक्ष आहे आणि सर्वोत्तम गुणांनी तो संपन्न आहे.
  268. शैतान तुम्हाला दारिद्र्याचे भय दाखवितो व लज्जास्पद कार्यपद्धतीचे अवलंब करण्यास प्रोत्साहन देतो, परंतु अल्लाह तुम्हाला आपली क्षमा आणि कृपेची आशा देतो. अल्लाह फार उदार व विवेकशील आहे.
  269. तो ज्याला इच्छितो त्याला विवेक प्रदान करतो, आणि ज्याला विवेक लाभला त्याला खर्‍या अर्थी मोठी दौलत लाभली. या गोष्टीपासून केवळ तेच लोक बोध घेतात जे विवेकशील आहेत.
  270. तुम्ही जे काही खर्च केले असेल आणि जो काही नवस केला असेल अल्लाहला त्याचे ज्ञान आहे आणि अत्याचार्‍यांचा कोणीही सहायक नाही.
  271. जर तुम्ही आपले दान जाहिररीत्या द्याल तर हे देखील चांगले आहे परंतु जर गुप्तरीत्या गरजूंना द्याल तर हे तुमच्यासाठी अधिक उत्तम आहे. तुमचे बरेचसे दोष या वर्तनाने नाहीसे होतात आणि जे काही तुम्ही करता अल्लाहला सर्व परिस्थितीत त्याचे ज्ञान आहे
  272. हे नबी (स.), लोकांना सरळ मार्गावर आणण्याची जबाबदारी तुमच्यावर नाही. अल्लाह ज्याला इच्छितो त्यालाच मार्गदर्शन प्रदान करतो आणि कल्याणकारी मार्गात जी संपत्ती तुम्ही खर्च करता ती तुमच्या स्वतःच्या हिताकरीता होय, शेवटी तुम्ही याचकरिता खर्च करता ना की अल्लाहची मर्जी संपादन करावी. म्हणून जी काही संपत्ती तुम्ही कल्याणकारी मार्गात खर्च कराल त्याचा पुरेपूर मोबदला तुम्हाला दिला जाईल आणि तुमचा हक्क कदापि हिरावला जाणार नाही.
  273. विशेषतः सहाय्य करण्यास पात्र ते गरीब आहेत जे अल्लाहच्या कार्यात असे गुंतले आहेत की स्वतःच्या उपजीविकेसाठी पृथ्वीवर काही धावपळ करू शकत नाहीत. त्यांचा स्वाभिमान पाहून अजाण मनुष्य समजतो की हे सुस्थितीत आहेत. तुम्ही त्यांच्या चेहर्‍यांवरून त्यांची आंतरिक स्थिती ओळखू शकता परंतु ते लोक असे नाहीत की जे लोकांच्या पाठीशी लागून काही मागतील. त्यांच्या सहाय्यासाठी जी काही संपत्ती तुम्ही खर्च कराल ती अल्लाहपासून दडून राहणार नाही.

  274. जे लोक आपली संपत्ती रात्री व दिवसा उघडपणे व गुप्तरीत्या खर्च करतात त्यांचा मोबदला त्यांच्या पालनकर्त्यापाशी आहे आणि त्यांच्यासाठी कसलेही भय आणि दुःखाला स्थान नाही.

  275. परंतु जे लोक व्याज खातात त्यांची दशा त्या माणसाप्रमाणे असते ज्याला शैतानाने स्पर्श करून झपाटून सोडले आहे. आणि ते या दशेत गुरफटण्याचे कारण हे आहे की ते म्हणतात, ’’व्यापारदेखील शेवटी व्याजासारखीच गोष्ट आहे.’’ वास्तविक पाहता अल्लाहने व्यापाराला वैध केले आहे आणि व्याजाला निषिद्ध. म्हणून ज्याला त्याच्या पालनकर्त्याकडून हा उपदेश मिळेल आणि तो भविष्यात व्याज खाण्यापासून परावृत्त होईल तर जे काही त्याने पूर्वी खाल्ले असेल ते खाल्ले, त्याचे प्रकरण अल्लाहच्या स्वाधीन आहे. आणि जो या आज्ञेनंतर त्याच गोष्टीची पुनरावृत्ती करील तो नरकवासी आहे, जेथे तो सदैव राहील.

  276. अल्लाह व्याजाचा र्‍हास करतो आणि दान-धर्माची वाढ करतो आणि अल्लाह कोणत्याही कृतघ्न आणि वाईट आचरण करणार्‍याला पसंत करत नाही.

  277. होय, जे लोक श्रद्धा ठेवतील आणि पुण्यकर्म करतील आणि नमाज कायम करतील व जकात देतील, निःसंशय त्यांचा मोबदला त्यांच्या पालनकर्त्यापाशी आहे आणि त्यांच्यासाठी कोणत्याही भयाचा आणि दुःखाचा प्रसंग नाही.

  278. हे श्रद्धावानांनो, अल्लाहचे भय बाळगा आणि जे काही तुमचे व्याज लोकांकडून येणे बाकी असेल ते सोडून द्या, जर खरोखर तुम्ही श्रद्धावंत असाल.

  279. परंतु जर तुम्ही असे केले नाही, तर सावध व्हा, अल्लाह व त्याच्या पैगंबराकडून तुमच्याविरूद्ध युद्धाची घोषणा आहे. अजूनसुद्धा पश्चात्ताप कराल (आणि व्याज सोडून द्याल) तर आपली मूळ रक्कम घेण्याचा तुम्हाला अधिकार आहे. तुम्ही कुणावर अत्याचार करू नका न तुमच्यावर कुणी अत्याचार करील

  280. तुमचा कर्जदार जर हलाखीच्या परिस्थित असेल तर सुबत्ता येईपर्यंत त्याला सवलत द्या. आणि जर दान करून टाकाल तर ते तुमच्यासाठी जास्त चांगले आहे, जर तुम्ही समजून घ्याल.

  281. त्या दिवसाच्या संकटापासून आपला बचाव करा जेव्हा तुम्ही अल्लाहकडे परत जाल, तेथे प्रत्येक माणसाला त्याने कमाविलेल्या पुण्य व पापाचा पुरेपूर मोबदला मिळेल आणि कोणावरही कदापि अन्याय होणार नाही.

  282. हे श्रद्धावानांनो, जेव्हा एखाद्या ठराविक मुदतीसाठी तुम्ही आपापसांत कर्जाची देवघेव कराल, तेव्हा ते लिहून घेत जा. उभयपक्षांमध्ये एका माणसाने न्यायाचे दस्तऐवज लिहावे. ज्याला अल्लाहने लिहिण्या-वाचण्याची क्षमता प्रदान केली आहे त्याने लिहिण्यास नकार देता कामा नये. त्याने लिहावे आणि दस्तऐवजाचा मजकूर त्याने सांगावा ज्याच्यावर जबाबदारी येते (अर्थात कर्ज घेणारा), आणि त्याने अल्लाहचे आपल्या पालनकर्त्याच्या क्रोधाचे भय बाळगले पाहिजे की जो करार झाला असेल त्यात काहीही कमी-जास्त करू नये. परंतु जर कर्ज घेणारा स्वतः नादान किंवा दुर्बल अथवा मजकूर सांगण्यालायक नसेल तर त्याच्या मुखत्याराने न्यायसंगतरीतीने मजकूर सांगावा. नंतर आपल्या पुरुषांपैकी दोघांची यावर साक्ष घ्या. जर दोन पुरुष नसतील तर एक पुरुष आणि दोन स्त्रिया असाव्यात म्हणजे जर एखादी विसरली तर दुसरीने तिला आठवण करून द्यावी. हे साक्षीदार अशा लोकांपैकी असावेत ज्यांची साक्ष तुमच्यात सर्वमान्य असावी. साक्षीदारांना साक्षीदार म्हणून काम करण्यास सांगितले गेल्यास त्यास त्यांनी नकार देऊ नये. बाब लहान असो किंवा मोठी, मुदत ठरविण्याबरोबरच तिचे दस्तऐवज लिहून घेण्यात आळस करू नका. अल्लाहजवळ ही पद्धत तुमच्यासाठी अधिक न्यायसंगत आहे, त्यामुळे साक्ष सिद्ध होणे सवलतीचे ठरते, आणि तुम्ही शंका-कुशंकामध्ये गुंतण्याची शक्यता कमी राहते, परंतु जी व्यापारी देवाण घेवाण तुम्ही आपापसांत हातोहात करता ती लिहिली गेली नाही तरी हरकत नाही, पण व्यापारासंबंधी सौदे ठरवीत असताना साक्षीदार ठरवत जा. लिहिणार्‍याला व साक्षीदाराला त्रास दिला जाऊ नये. असे कराल तर गुन्हेगार ठराल. अल्लाहच्या प्रकोपापासून स्वतःचे रक्षण करा. तो तुम्हाला योग्य कार्यपद्धतीची शिकवण देतो आणि त्याला प्रत्येक बाबीचे ज्ञान आहे.

  283. जर तुम्ही प्रवासांत असाल आणि दस्तावेज लिहिणारा कोणी मिळाला नाही तर वस्तू कब्जेगहाण ठेऊन व्यवहार करा. जर तुमच्यापैकी एखाद्याने दुसर्‍यावर विश्वास ठेवून त्याच्याशी एखादा व्यवहार केला, तर ज्याच्यावर विश्वास ठेवला गेला आहे, त्याने अमानत परत केली पाहिजे आणि त्याने अल्लाहचे - आपल्या पालनकर्त्याचे भय बाळगावे. आणि साक्ष कदापि लपवू नका. जो साक्ष लपवितो त्याचे हृदय पापाने भरलेले आहे. आणि अल्लाह तुमच्या कृत्यांपासून गाफिल नाही.

  284. आकाशांत व पृथ्वीमध्ये जे काही आहे ते सर्व अल्लाहचे आहे. तुम्ही आपल्या मनांतील गोष्टी प्रकट करा अथवा लपवा अल्लाह कोणत्याही परिस्थितीत तुमच्याकडून त्यांचा हिशेब घेईल. मग त्याला हा अधिकार आहे, की त्याने हवे त्याला माफ करावे आणि हवे त्याला शिक्षा द्यावी. प्रत्येक गोष्टीवर त्याला सामर्थ्य आहे.

  285. पैगंबराने त्या मार्गदर्शनावर श्रद्धा ठेवली आहे जे त्याच्या पालनकर्त्याकडून त्याच्यावर अवतरले आहे, आणि श्रद्धावानांनीसुद्धा ते मार्गदर्शन मनापासून स्वीकारले आहे. हे सर्व अल्लाह आणि त्याच्या फरिश्त्यांना व त्याच्या ग्रंथांना आणि त्याच्या पैगंबरांना मानतात आणि त्यांचे विधान असे आहे की, ’’आम्ही अल्लाहच्या पैगंबराना एक दुसर्‍यापासून वेगळे करीत नाही, आम्ही आज्ञा ऐकली आणि अनुसरण स्वीकारले. हे स्वामी! आम्ही तुझ्यापाशी गुन्हा माफीचे इच्छुक आहोत आणि आम्हाला तुझ्याकडेच परतावयाचे आहे.’’

  286. अल्लाह कोणत्याही व्यक्तीवर त्याच्या शक्तीपेक्षा जास्त जबाबदारीचे ओझे टाकीत नसतो. प्रत्येक व्यक्तीने जे पुण्य कमविले आहे, त्याचे फळ त्याच्यासाठीच आहे आणि जे पाप गोळा केले आहे त्याचा दुष्परिणाम त्याच्यावरच होणार आहे. (श्रद्धावानांनो, तुम्ही अशी प्रार्थना करीत जा) हे आमच्या पालनकर्त्या! आमच्याकडून भूलचुकीने जे अपराध घडतील, त्यांच्यासाठी आम्हाला पकडू नकोस. हे स्वामी, आमच्यावर तसा भार टाकू नकोस जसा तू आमच्या पूर्वीच्या लोकांवर टाकला होतास. हे पालनकर्त्या! जो भार उचलण्याची शक्ती आमच्यात नाही तो आमच्यावर लादू नकोस. आमचे अपराध पोटात घे, आम्हाला क्षमा कर, आमच्यावर दया कर, तूच आमचा वाली आहेस, अश्रद्धावंतांच्या विरूद्ध आम्हाला सहाय्य कर.

Post a Comment

Thansk For Ur Comment

Previous Post Next Post